पनवेल-कळंबोली येथील ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्था’ या आश्रमशाळेची स्थापना रामचंद्र करंजुले याने गतिमंद मुलींच्या भल्यासाठी नव्हे, तर केवळ वासनातृप्तीसाठी आणि देणगीचे पैसे फस्त करण्यासाठी केली होती. त्याने केलेल्या गुन्ह्य़ाचे स्वरुप पाहता त्याला जगण्याचा अधिकार नाही. घृणास्पद कृत्य करून समाजास कलंक बनलेल्या करंजुलेला शिक्षेत दया दाखविणे योग्य नसल्याचे मत नोंदवत विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
आश्रमशाळेतील तीन मुलींसह एकूण पाच गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्याला बुधवारी दोषी धरले होते. परंतु, विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश पी. व्ही. गनेडिवाला यांनी करंजुले सुनावलेली फाशीची शिक्षा ही बलात्कारासाठी नसून त्याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीच्या खुनाप्रकरणी सुनावली आहे. निकालात न्यायालयाने नमूद केले आहे की, दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच कायदा बदलण्याची गरज निर्माण झाली असून, महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणे अनिवार्य बनलेले आहे. अन्यथा न्यायप्रक्रिया आपले काहीही करू शकत असा चुकीचा संदेश समाजात जाईल. दरम्यान, आश्रमशाळेची अधीक्षक सोनाली बदाडे आणि काळजीवाहक पार्वती मावले या दोघींना न्यायालयाने प्रत्येकी १० वर्षांची शिक्षा सुनावली आह़े     

Story img Loader