‘लखनभय्या बनावट चकमक’ प्रकरणात दोषी पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच पोलिसांच्या कुटुंबियांचा बांध फुटला़ त्यांच्या बायका- मुलांनी न्यायालयात अक्षरश: टाहो फोडला. न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे. न्यायालयाने आपला निर्णय बदलावा अन्यथा आपल्यालाही फासावर लटकावण्याचा निकाल द्यावा, असा आक्रोश पोलिसांच्या कुटुंबियांनी न्यायालयात केला. आतापर्यंत न्यायालयाला आपण देवाच्या स्थानी मानत होतो.
परंतु, असा निर्णय देऊन तुम्ही पोलिसांवर आणि आमच्यावर अन्याय केला, असा आरोप या कुटुंबीयांनी केला. ‘मी माझे कर्तव्य पार पाडले आहे, योग्य निर्णय दिला आहे. तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाला, असे वाटत असेल तर वरच्या न्यायालयात दाद मागा,’ असे सुमारे अर्धा तास चाललेल्या कुटुंबीयांच्या आक्रोशानंतर न्यायालयाने त्यांना  सांगितले.
आता नागरिकांनीच स्वत:चे संरक्षण करावे!
न्यायालय शिक्षा सुनावत असतानाच तानाजी देसाई या दोषी पोलिसाने न्यायालयाकडे बोलण्याची संधी मागितली. त्याला परवानगी देताना त्याच्या बोलण्याने निकालावर काहीही परिणाम होणार नाही, हे न्याायालयाने स्पष्ट केले. तरीही देसाई यांनी आपले म्हणणे मांडले. आपण गेली २० वर्षे सेवेत असून १९९६- २००३ या कालावधीत ३०० हून अधिक गुंडांना मुंबई पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्याचमुळे लोक निर्भयपणे रस्त्यावर फिरू शकतात. परंतु न्यायालयाच्या या निर्णयाने पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. या पुढे कुठलाही पोलीस ही जबाबदारी पार पाडण्यास पुढे सरसावणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या पुढे आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च्याच खांद्यावर घ्यावी, असे निवेदन देसाई यांनी केले.

Story img Loader