दक्षिण मुंबईत गिरगाव चौपाटीच्या एका बाजूला उभी असलेली उंच टेकडी म्हणजे ‘मलबार हिल.’ हिरवाईने सदैव नटलेली मलबार हिल म्हणजे मुंबईच्या मस्तकावरील सोनेरी मुकुट. उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या परिसरात पर्यटकांना भुलवणारी विविध उद्यानेही आहेत. राजभवन, कमला नेहरू पार्क, म्हातारीचे बूट, हँगिंग गार्डन आदी निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे याच परिसरातील. हँगिंग गार्डन ज्याला मलबार हिलचे ‘टेरेस गार्डन’ म्हटले जाते, ते पर्यटकांचे विशेषत: प्रेमीयुगुलांचे आवडते ठिकाण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत उंचावर असलेल्या या ठिकाणाहून अरबी समुद्राचा आणि गिरगाव चौपाटीचा विहंगम नजारा अनुभवता येतो. आकर्षक रस्ते असलेल्या मलबार हिलवर म्हातारीच्या बुटाजवळच हँगिंग गार्डन वसवण्यात आले आहे. १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर हँगिंग गार्डनचा अद्भुत नजारा समोर दिसतो. अगदी नियोजनबद्ध हे उद्यान वसवण्यात आले आहे. आकर्षक पायवाटा, हिरवळ, विविध फुलझाडे, रोप, रंगीत कारंजे यांमुळे हे उद्यान अधिकच रमणीय आणि आकर्षक वाटते. या उद्यानाचे वैशिष्टय़ म्हणजे रोप, वेलींना आकर्षक आकार देऊन विविध प्राण्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. हत्ती, घोडा, जिराफ, उंट, बैल या प्राण्यांच्या हिरवाईने नटलेल्या प्रतिकृती खूपच आकर्षक आणि निसर्गरम्य वाटतात.

या उद्यानाचे सध्याचे नाव आहे ‘फिरोजशहा मेहता उद्यान’. मात्र हँगिंग गार्डन म्हणूनच ते सर्वपरिचित आहे. पूर्वी येथे एक तलाव होता, तो बुजवून त्यावर उद्यानाची निर्मिती केली आहे. १८८०मध्ये निर्माण झालेल्या या उद्यानाची १९२१मध्ये पुनर्रचना करण्यात आली. गिरगाव चौपाटीच्या अगदी बाजूलाच टेकडीवर असल्याने या उद्यानातून सागरी नजारा अतिशय रमणीय दिसतो. सायंकाळी येथे सूर्योदयाचे विलोभनीय दर्शन होते. दूर क्षितिजावर समुद्रात डुंबणारा लालबुंद सूर्यनारायण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे हजेरी लावतात. हळूहळू अंधार पडू लागतो आणि या उद्यानातील रंगीत प्रकाशावर थुईथुई नाचणारे कारंजी सुरू होतात आणि उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

या उद्यानाचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे उद्यानात बांधण्यात आलेले जलसंवर्धन केंद्र. या केंद्रातून पर्यटकांना शुद्ध व नितळ पाण्याचा पुरवठा केला जातो. उद्यानातील झाडे, रोप यांनाही येथूनच जलपुरवठा होतो. याच पाण्यावर येथील रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. विविध रंगांची, आकर्षक फुले कॅमेराबद्ध करण्यासाठी अनेक छायाचित्रकार येथे येत असतात.

शुद्ध हवा, मनमोकळे वातावरण आणि निसर्गाचा सहवास हवा असल्यास मुंबईतील या उद्यानाला पर्याय नाही. सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या बहुतेक मुंबईकरांना निसर्गाचा सहवास जरा कमीच लाभतो. दररोजची धावपळ, प्रदूषित आणि थकवा आणणारे वातावरण यामुळे ‘हँग’ झालेल्यांनी समुद्राच्या बाजूला उंच टेकडीवर वसलेल्या ‘हँगिंग गार्डन’ला जरूर भेट द्यावी.

हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता उद्यान)

कसे जाल?

  • सीएसटी किंवा चर्चगेट स्थानकाबाहेरून टॅक्सी किंवा बेस्ट बसने हँगिंग गार्डनकडे जाता येते.
  • चर्नी रोड स्थानकापासून अगदी जवळ असलेल्या या उद्यानापाशी टॅक्सीने जाता येते.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanging garden mumbai
Show comments