मुंबईची जुनी ओळख असलेली आणि उंचावर बांधण्यात आलेले ब्रिटीशकालीन हँगिग गार्डन आता पुढील सात वर्षांसाठी बंद होणार आहे. १३६ वर्षांचा इतिहास असलेले हँगिग गार्डन त्या खाली असलेल्या जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
२०१७ साली हँगिग गार्डनच्या खाली असलेल्या जलायशयाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. त्यावेळी जलाशयाच्या छताकडील भाग आणि आधारासाठी उभारलेले स्तंभ कमकुवत असल्याचे निदर्शनास आले होते. या टाकीची क्षमता १४७ लीटर दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे ती पूर्णपणे पाडल्याशिवाय त्याचे बांधकाम होणे अशक्य असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. परिणामी या जलशयाचे बांधकाम करण्याकरता हँगिग गार्डन टप्प्याटप्प्याने सात वर्षांसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, जलाशयाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी ६९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, हँगिग गार्डन येथील या जलाशयाच्या विकासकामाला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक बोलावली आहे. हँगिग गार्डनमधील या जलाशयातून दक्षिण मुंबईच्या अनेक भागात पाणीपुरवठा केला जातो. शहरातील उंचीपैकी असलेल्या जागेवर हे जलाशय बांधण्यात आले आहे. त्यामुळे या प्रक्रियेत काहीतरी पर्यायी मार्ग शोधण्याचं आश्वासन लोढा यांनी दिलं स्थानिकांना दिलं आहे.
पालिकेच्या स्थायी समितीने २०२२ मध्ये या टाकीची क्षमता १४७ दशलक्ष लीटरहून १९१ दशलक्ष लीटरपर्यंत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. दक्षिण मुंबईच्या ३० लाखांहून अधिक नागरिकांना या जलाशयातून पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता.
झाडांचं होणार पुनर्रोपण
हँगिग गार्डनचा परिसर हिरवळीने नटलेला आहे. इथं अनेक प्रकारची ३८९ झाडे आहेत. यापैकी १८९ झाडे तोडावी लागणार असून २०० झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, फणस, नारळ, चिकू आणि आवळा हीसुद्धा झाडे आहेत.