मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्य आदेश देऊनही गुरूवारी न्यायालयात अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायव्यवस्था तुम्हाला गंमत वाटली का ? असा संतप्त प्रश्न करून विशेष न्यायालयाने राणा दाम्पत्य आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले.
हेही वाचा >>> उच्च न्यायालयाची पुरातत्व वारसा लाभलेली इमारत जपायला हवी- मुख्य न्यायमूर्तींची टिप्पणी
संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार नवनीत राणा यांची अनुपस्थिती समजू शकते. मात्र, आमदार रवी राणा अनुपस्थित का? असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच, राणा दाम्पत्याच्या चालढकल वृत्तीवर विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ताशेरे ओढले. न्यायालयाच्या नाराजीनंतर सरकारी वकील न्यायालयात उपस्थित झाले. त्यावेळी न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का ? अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, पुढील सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्याने उपस्थित राहण्याचे आदेश देताना ही शेवटची संधी असल्याचे बजावले.
हेही वाचा >>> मुंबई: चुनाभट्टीतील धोकादायक ‘टाटा नगर’ इमारतीवर महानगरपालिकेचा हातोडा
मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, दोघांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपही राणा दाम्पत्यावर आहे. राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर असून आवश्यक असेल तेव्हा सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची अट त्यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली होती. परंतु, वारंवार आदेश देऊनही राणा दाम्पत्य अनेकदा सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले. त्यावेळीही, न्यायालयाने त्यांच्या या वागणुकीवर ताशेरे ओढले होते. न्यायालयाने राणा दाम्पत्याला गुरूवारीही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, गुरूवारच्या सुनावणीलाही राणा दाम्पत्य अनुपस्थित होते. त्यांचे वकील तसेच सरकारी वकील आणि तपास अधिकारीही अनुपस्थित होते. राणा यांचे वकील आजारपणामुळे अनुपस्थित असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने पुन्हा एकदा त्याबाबत नाराजी व्यक्त केली.