‘बांगलादेशातून मुंबईत आलेल्या त्या २०- २१ वर्षांच्या मुलीकडे मी निरखून पाहत होते. किती सुंदर दिसत होती ती. दृष्ट लागण्याजोगं सौंदर्य तिला देवानं दिलं होतं. माझ्यासाठी काहीतरी आणायला मी तिला बाहेर पिटाळलं. बराच वेळ निघून गेला पण ती काही आली नाही. मी कामाठीपूऱ्यात होते. त्यामुळे ती कुठे गेली असणार याची कल्पना मला आली. तिला शोधण्यासाठी मी घरात शिरले, पडदा बाजूला केला. ती एका पुरुषासोबत होती. अर्थात ती शरीरविक्रय करणारी होती, यातूनच तिचं पोट भरत होतं. त्यामुळे मी स्वत:ला सावरलं पण त्याचवेळी मी खोलीत भयंकर दृश्य पाहिलं. कारण या देहविक्रय करणाऱ्या मुलीशेजारी तिचं काही महिन्यांचं तान्हं बाळं तिच्या ओढणीशी खेळत होतं. वीसएक वर्षांची मुलगी आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन देहविक्रय करत आहे हे पाहणं जगातल्या सर्वात भंयकर दृश्यापैकी एक होतं. हे दृश्य पाहून आपण माणूस असल्याची लाज मला वाटली’
‘मला पाहून त्या मुलीनं सहज विचारलं ‘तूला हवीय का ही मुलगी? तसंही इथे राहून हिलाही देहविक्रीच्या व्यवसायात ओढून नेतील त्यापेक्षा तूच घेऊन जा ती’ देहविक्रय करणारी मुलगी गौरी सावंत यांना सांगत होती. त्याच क्षणी देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींसाठी काहीतरी करण्याचा विचार गौरी यांनी पक्का केला आणि इथूनच सुरू झाला ‘आजीचं घर’ या त्यांच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांचा प्रवास. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींना एक सुरक्षित आयुष्य मिळावं, त्यांचं योग्यरितीनं संगोपन व्हावं म्हणून गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या हक्काचं ‘आजीचं घर’ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘मिलाप’ या फंडरायझिंग वेबसाईट्स आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामधून जिंकलेल्या पैशातून आतापर्यंत ३४ लाख ५७ हजारांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत जमवण्यात गौरीला यश आलं आहे.
या प्रकल्पासाठी गौरीला ६० लाख हवे आहेत. सध्या देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पाच मुली गौरी सांभाळत आहेत. ‘आजीच्या घराचं’ स्वप्न पूर्ण झालं तर ५० हून अधिक मुलींना आपलं सुरक्षित आयुष्य जगता येण्यासारखं हक्काचं घर मिळेल असं गौरी सांगतात. ‘मिलापच्या काऊड फंडिंग संकल्पनेतून अनेक जण मदत करतात, अनेकांना कामाविषयी कुतूहल निर्माण होतं, ते काम पाहतात आणि सढळहस्ते मदत करतात. लोकांनी मदतीचा हात पुढे केल्यानं आता आर्थिकदृष्ट्या अडचणींचा पूर्वीइतका सामना करावा लागत नाही’ असंही त्या म्हणाल्या.
गौरी यांच्या आजीच्या घरात येणाऱ्या प्रत्येक मुलींचं संगोपन हे तृतीयपंथांमधील ज्येष्ठ वक्ती करणार आहेत. काही वर्षांपूर्वी गौरीनं सहा वर्षांची मुलगी गायत्रीचं मातृत्त्व स्विकारलं. गौरी तृतीयपंथी असल्यानं समाजातील अनेक लोकांनी त्यांना विरोध केला पण त्या सगळ्यांचं पुरुन उरल्या. ‘मला निसर्गाने गर्भाशय दिलेलं नाही, पण म्हणून काही मला कोणी आई बनण्यापासून रोखू शकत नाही. मलाही त्या मातृत्त्वाचा अनुभव घ्यायचा आहे.’ गौरी ठामपणे सांगतात. गायत्रीसारख्याच आणखी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलींना दत्तक घेण्याचा गौरी यांचा निर्धार ठाम आहे. शिक्षणासोबतच प्रेम, आपुलकी, सुरक्षितता, आरोग्य देऊन अशा मुलींना चांगल्या संधी देऊ केल्या तर नक्कीच त्यांचं भविष्य उज्वल असेल आणि या समाजात त्यांना आयुष्य सन्मानाने जगता येईल, असा विश्वास गौरी यांना आहे.
प्रतीक्षा चौकेकर
pratiksha.choukekar@loksatta.com