रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवास केल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकल प्रवास सुरू केल्याच्या घटनेला अर्धा तास उलटत नाहीत तोच हार्बर मार्गावर एक गाडी पाऊण तास खोळंबली. पनवेलला जाणारी गाडी मुंबईहून सुटली आणि सँडहर्स्ट रोड स्थानकात ही गाडी थांबवण्यात आली. या गाडीच्या चाकांमध्ये २० ते २५ फुटांची पट्टी अडकून ती सीएसटीपर्यंत घासत आली. त्यामुळे ही गाडी सँडहर्स्ट रोड स्थानकात थांबवण्यात आली होती. अखेर पाऊण तासाच्या कामानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून संध्याकाळी ७.१०च्या सुमारास पनवेल लोकल रवाना झाली. या लोकलच्या कुल्र्याच्या दिशेच्या डब्यांच्या चाकांमध्ये २० फुटी लोखंडी पट्टी अडकली होती. ही पट्टी घासत घासत सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत गेली. या स्थानकात या पट्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तपासाअंती ही पट्टी अर्थिगसाठी वापरात असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी ७.१८ वाजता ही गाडी सँडहर्स्ट रोड स्थानकात थांबवण्यात आली. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले.
आपत्कालीन स्थितीत गाडीतून उतरण्यासाठी असलेल्या लोखंडी पायऱ्याही तुटल्या असल्याचे आणि त्या घासल्याचेही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गाडी हे दुरुस्तीचे काम अधिक काळ लांबले. अखेर सायंकाळी ८.०५च्या सुमारास ही गाडी पुढे रवाना करण्यात आली. मात्र या दरम्यान मुंबईहून हार्बर मार्गावर रवाना होणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. यामुळे आठ सेवा रद्द करण्यात आल्या असून वाहतूक पाऊण तास उशिराने सुरू होती.
घातपाताची शक्यता?
हार्बर मार्गावर कुल्र्याच्या दिशेने रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नेहमीच गस्त घालत असतात. ही अर्थिग पट्टी नेमकी कोणत्या कारणामुळे चाकांमध्ये अडकली, हे समजू शकलेले नाही. तसेच गाडीला असलेला लोखंडी जिनाही कसा तुटला, हे कोडेही रेल्वे प्रशासनासमोर आहे. या सर्व प्रकरणात काही घातपाताची शक्यता आहे का, याची चौकशीही आता होणार आहे.