हार्बर मार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे हैराण झालेल्या मानखुर्दकरांनी मानखुर्द स्थानकातच ‘रेल्वे रोको’चे हत्यार उपसल्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून हार्बर मार्गावरील इतर स्थानकांमध्येही प्रवाशांच्या सहनशीलतेचा स्फोट होण्याची शक्यता आहे. मुख्य मार्गाच्या तुलनेत दुर्लक्षित झालेल्या आणि तरीही गेल्या दशकभरात प्रवासी भारमान २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेल्या हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या समस्यांची तड काही केल्या लागत नाही. रेल्वे प्रशासनाच्या मते, पुढील सहा महिन्यांत हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र त्यासाठी रेल्वेला राज्य सरकारच्या मदतीचीही अपेक्षा आहे.
जुनाट आणि नऊ डब्यांच्याच गाडय़ा, त्यांच्या दर दिवशी दिरंगाईने चालणाऱ्या फेऱ्या, दोनच रेल्वेरूळ, जलद गाडय़ांचा अभाव अशा अनेक समस्यांनी हार्बर मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. त्यातच पावसाळ्यात रेल्वेने मानखुर्दहून सुटणाऱ्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळा उलटला, तरी अद्याप रेल्वेने या सेवा पुन्हा सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी शनिवारी सकाळी मानखुर्द स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केले. त्यांचाच कित्ता इतर स्थानकांवरीलही प्रवासी गिरवण्याची शक्यता आहे.
मुख्य मार्गावर डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वे हार्बर मार्गावर हे काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण करणार आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय हार्बर मार्गावरील जूनाट गाडय़ा बदलता येणार नाहीत. तसेच हार्बर मार्गावरील रे रोड, वडाळा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि डॉकयार्ड रोड या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही अद्याप झालेले नाही. हे काम डिसेंबर-जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालू शकतील, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
वडाळ्याजवळील रावली क्रॉसिंगमुळे बहुतेक वेळा हार्बर मार्गावरील वाहतूक दिरंगाईने सुरू असते. येथे वाहनांसाठी पूल बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेला राज्य सरकारच्या सहकार्याची आवश्यकता होती. रेल्वेने राज्य सरकारकडे त्याबाबत प्रस्तावही पाठवला आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्यावर तोडगा निघेल आणि हार्बर मार्गावरील वाहतूक वक्तशीर चालेल, अशी अपेक्षाही या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Story img Loader