* रे रोड आणि चेंबूर येथील पुलांखाली उंची कमी
* मध्य रेल्वे म्हणते, पूर्वानुभव उपयोगी ठरणार
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डीसी-एसी विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्यानंतर आता मध्य रेल्वेने आपला मोर्चा हार्बर मार्गाकडे वळवला आहे. डीसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या या देशातील एकमेव मार्गावर विद्युतप्रवाह परिवर्तन करण्यासाठी मध्य रेल्वेने मार्च २०१६ची कालमर्यादा ठरवली आहे. मात्र मुख्य मार्गाप्रमाणे या मार्गावरही दोन ठिकाणी या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. पण मुख्य मार्गावरील अडथळे पार करत परिवर्तन पूर्ण करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या मते हाच अनुभव त्यांना हार्बर मार्गावरील हे अडथळे दूर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
डीसी-एसी परिवर्तनाचे काम हार्बर मार्गावर टप्प्याटप्प्यात चालू झाले आहे. हार्बर मार्गावरील जुनाट गाडय़ा निकाली काढण्यासाठी आणि प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी हे परिवर्तन आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गावर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या टप्प्यात परिवर्तन करताना अनेक ठिकाणी अडथळे आले होते. या मार्गावरील दादरपुढील अनेक पुलांखालील उंची कमी असल्याने रूळ खाली घ्यावे लागले होते. त्यामुळे परिवर्तनाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी मिळण्यातही अडचण आली होती. तसेच परवानगी मिळाल्यावरही सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी वेगमर्यादा असल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले होते.
या पाश्र्वभूमीवर हार्बर मार्गावर हे काम करताना रे रोड आणि चेंबूर येथील पुलांखालील उंची कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलांखालील रेल्वे रूळ खाली घ्यायचे की, पुलाची डागडुजी करून तेथे ओव्हरहेड वायर टाकायची, अशा विविध उपायांचा विचार मध्य रेल्वे करत आहे. मुख्य मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाचे काम करत असताना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना आम्ही आधीच केला आहे. त्यामुळे या अडचणींना सामोरे कसे जायचे, याची तयारी झाली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील या दोन ठिकाणी काम करणे अडचणीचे नसेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता राजीव अग्रवाल यांनी सांगितले. मात्र या भागात वेगमर्यादा लागेल की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे सुरक्षा आयुक्तांचाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हार्बर मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाचे काम धीम्या गतीने सुरू असून डिसेंबर २०१५नंतर त्याला जोर येईल. हे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण केले जाईल. नव्याने येणाऱ्या बंबार्डिअर गाडय़ांपैकी ३० गाडय़ा तोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. पश्चिम रेल्वेवरील ३० गाडय़ा मध्य रेल्वेवर येतील. त्यामुळे हार्बर मार्गावर चालणाऱ्या डीसी प्रवाहाच्या ३० गाडय़ा ताफ्यातून बाहेर जाणे सहज शक्य होईल आणि वाहतुकीत अडथळा येणार नाही, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Story img Loader