वाशीकडे जाणारी उपनगरी गाडी गुरुवारी सायंकाळी वाशी खाडी पुलाजवळ बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांच्या रांगा लागल्या. तसेच हार्बर मार्गावरील उपनगरी वाहतूक रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली होती.
सीएसटीवरून वाशीकडे जाणारी गाडी मानखुर्द स्थानकाच्या पुढे वाशी पुलाजवळ सायंकाळी ७.२२ वाजता तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. गाडीच्या एका युनिटमध्ये बिघाड झाल्यामुळे गाडी बंद पडल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री ८.१२ वाजता गाडीतील बिघाड दूर करण्यात तंत्रज्ञांना यश आले आणि गाडी पुढे नेण्यात आली. यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या रांगा थेट कुर्ला स्थानकापर्यंत लागल्या होत्या. पनवेलकडे जाणाऱ्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वाशी पुलाजवळ गाडी बंद पडल्यानंतर प्रवाशांनी उतरून पुढे जाण्यास सुरुवात केली. काहींनी जवळच असलेल्या महामार्गावर जाऊन तेथे बेस्टच्या बसेस तसेच मिळेल त्या वाहनांनी वाशीपर्यंत जाणे पसंत केले. यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली होती. त्यातच मानखुर्द येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा