मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या आठवडय़ाभरापासून मध्य रेल्वे वरील प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पण याच मध्य रेल्वेचा भाग असणाऱ्या हार्बर मार्गावर ही ओरड रोजचीच झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गाचा प्रवास प्रवाशांसाठी समस्यांचे आगार झाला आहे.
हार्बर मार्गावर अप आणि स्लो असे दोनच रेल्वेमार्ग असल्याने येथे अद्याप जलद लोकल सुरू झालेली नाही. नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असली तरी लोकलच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही. नवी मुंबईत असणाऱ्या काही स्थानकांवर तर अर्धा ते पाऊणतास लोकल नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे.
या रेल्वेमार्गावर वडाळा आणि कुर्ला ही दोन प्रमुख स्थानके आहेत. या दोन्ही रेल्वेस्थानकांवर पश्चिम आणि मध्य रेल्वेचे प्रवासी जा-ये करत असतात. येथील फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मात्र त्यावही रेल्वेने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही.
ऐन गर्दीच्या वेळी कुल्र्यातील सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटावरून लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे म्हणजे जीवाशीच खेळ असतो. दिवसभरामध्ये कुठल्याही वेळी या फलाटावर गेलात तर गर्दी कायम दिसेल. गर्दीमुळे लोकलमध्ये जागा न मिळालेले प्रवाशी दरवाजामध्ये उभे राहून प्रवास करतात. परीणामी लोकल मधून पडून काही प्रवाश्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू हे हार्बर रेल्वेवर झाले आहेत. न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही हार्बरवरील एकाही स्थानकाबाहेर रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात अडचणी येत असल्याशी रेल्वे प्रवाशी संघाचे धमेंद्र शर्मा यांनी सांगितले.
अपुरे पादचारी पूल, फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हे प्रश्नही गंभीर आहेत. त्यातच आता काही तांत्रिक कामासाठी आठवडाभर हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे  हार्बरची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader