• पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची ग्वाही
  • ‘इको फ्रेण्डली घरगुती गणपती सजावट’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गेल्या काही वर्षांत पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत प्लास्टिकच्या वापरावर र्निबध आणले जातील, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले. ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संयुक्त विद्यमाने नरिमन पॉइंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये सोमवारी मोठय़ा उत्साहात पार पडलेल्या ‘इको फ्रेण्डली घरगुती गणपती सजावट’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पॉवर्ड बाय चितळे डेअरी असलेल्या या स्पर्धेला वर्षांनुवर्षे उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरणाच्या बचावासाठी प्रत्येकाने शासन म्हणजे आपण असा विचार करणे गरजेचे आहे. देशात अनेक ठिकाणी नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे प्रदूषणही वाढत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर कायदा करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी तितकेच कठोर असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शक्य असेल तेव्हा गणेशोत्सवाला येत होते, अशी आठवणही या वेळी कदम यांनी सांगितली.

एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पर्यावरणाला पूरक अशी स्पर्धा सातत्याने सुरू ठेवणे हे ‘लोकसत्ता’चे यश आहे. पर्यावरणासाठीची ही चळवळ लोकचळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे.

लंडनसारख्या देशातही गणेशोत्सव साजरा करतानाही शाडूच्या मूर्तीला पसंती दिली जाते. त्यामुळे आपणदेखील शाडूच्या  मूर्ती घ्याव्यात, असे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी सांगितले.

या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन्, जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक दिनेश गुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मी सजावटीत दोन वेगवेगळे भाग केले होते. एकामध्ये कंपन्यांतून निघणारा धूर, झाडांची कत्तल यामुळे पृथ्वी नष्ट होत चालली आहे, असा देखावा उभा केला होता, तर दुसऱ्या भागात वृक्ष लागवड केल्यास त्याचे होणारे लाभ दाखविले होते. कागदाचा आणि डिंकाचा वापर करून गणेशमूर्ती बनवली होती.

सतीश मयेकर, डोंबिवली (प्रथम पारितोषिक विजेते)

मी बनविलेल्या गणपतीच्या मूर्तीसोबत एक झाड होते. त्यात एक लाकूडतोडय़ा त्या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घालत होता. त्या झाडाला वाचविण्यासाठी स्वत: गणेशाला पृथ्वीवर यावे लागले, असा सजावटीचा विषय होता.

संतोष वर्टेकर, लोअर परेल (द्वितीय पारितोषिक विजेते)

 

टिळकांचे छायाचित्र लावले नाही म्हणून..

१९८०च्या काळात मीदेखील ‘लोकसत्ता’च्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेतला होता. कांदिवलीच्या हनुमान नगर येथे आमच्या मंडळाच्या  देखाव्याची सजावट मी स्वत: केली होती. सजावट  पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी उसळत होती. मात्र, इतके सारे असतानाही मला पहिला क्रमांक पटकावता आला नाही. याबाबत मी परीक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी ‘सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केली, मात्र त्यांचे छायाचित्र तुम्ही लावले नाही, म्हणून बक्षीस गेले,’ असे सांगितले. इतक्या काटेकोरपणे या स्पर्धेचे परीक्षण केले जाते.

रामदास कदम</strong>

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hard restriction on plastics in coming years says environment minister ramdas kadam