पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे राज्याचा दहशतवादविरोधी विभाग आनंदित झाला आहे. बॉम्बस्फोटात केवळ सहभाग असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली़ या प्रकरणातील लहान- लहान पुरावेही सादर केल्यामुळेच ते शक्य झाल्याचे दहशतवादविरोधी पथकातील सूत्रांनी सांगितले.
या पथकाचे प्रमुख व अतिरिक्त महासंचालक राकेश मारीया तसेच अधीक्षक प्रदीप सावंत यांचे गेल्या वर्षभरातील वैयक्तिक कष्ट फळाला आल्याचेही या तपासाशी संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले. अनेक तपशील न्यायालयापुढे आणताना त्याची किचकट गुंफण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारीया स्वत: प्रयत्नशील होते, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
हिमायतने युसूफ हे बनावट नाव धारण केले होते. तेही आम्ही योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे सिद्ध केले. त्यासाठी आमच्या पथकाला अनेक दिवस घालवावे लागले. स्फोटके ठेवल्याबाबतचेही अनेक पुरावे गोळा करताना अगदी क्षुल्लक तपशीलालाही आम्ही महत्त्व दिले. हिमायतचे ग्लोबल इंटरनेट कॅफे ते त्याचे या काळात असलेले वास्तव्य सिद्ध करण्यासाठी आम्ही सरकारी कागदपत्रे न्यायालयात सादर केली, असेही या सूत्रांनी सांगितले. परिस्थितीजन्य पुराव्याबरोबरच अनेक थेट पुरावेही सादर केले. त्यामुळे या स्फोटासाठी आवश्यक ती स्फोटके हिमायतकडे सापडली, हेही स्पष्ट करता आले. त्याच्याबरोबरच्या काही मित्रांच्या साक्षीही आम्ही नोंदवून त्या न्यायालयात हजर केल्या. त्यामुळे हा खटला अधिक सक्षम झाल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. जिहादसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असलेला हिमायत पुण्यात कसा आला तसेच त्याचे कुठे वास्तव्य होते, हे पुरावेही त्याचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी उपयोगी पडले. त्यामुळे त्याचा या स्फोटातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाला त्याला दोषी ठरविणे कठीण गेले नाही, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा