‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. BCCI च्या प्रशासकीय समितीने या बाबतची कारवाई केली. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेला मुकावे लागले आहे.
मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण त्यावर हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण पटलेले नसून या दोन्ही खेळाडूंवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी, असा प्रस्ताव विनोद राय यांनी मांडला होता. पण BCCI च्या प्रशासकीय समितीच्या (CoA) सदस्या डायना एडलजी यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होताना दिसत आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांनीदेखील त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी या दोघांच्या विधानांचा निषेध केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खरा सज्जन माणूस हा सर्वत्र सज्जनच असतो. (जागा पाहून तो आपली वर्तणूक चांगली – वाईट करत नाही) असा संदेश दिला आहे. तसेच या सोबत त्यांनी एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. त्यात महान खेळाडूचे लक्षण काय? यावर मैदानात धावा करणे आणि मैदानाबाहेर (जीवनात) महिलांचा आदर करणे असे लिहिले आहे.
A ‘Gentleman’ is a Gentleman, always and everywhere. pic.twitter.com/oANwZH2WwY
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 14, 2019
मुंबई पोलिसांच्या या ट्विटला चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच अनेक लोकही याबाबत आपले मत मांडत आहेत.