मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केल्याचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. त्यांनी सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केल्यामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.

विधान परिषदेचे कामकाज सोमवारी सुरू झाल्यानंतर सपभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारली. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याचा मुद्दा उपस्थित केला. दरेकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आहेत. उत्तम पद्धतीने राज्याचा कारभार चालवत आहेत, असे असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेब जसा क्रूर प्रशासक होता, त्याच्यासोबत फडणवीस यांची तुलना करण्याचे घाणेरडे कृत्य त्यांनी केले आहे. सपकाळ यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. हा देवेंद्र फडणवीस याचा व्यक्तिगत अपमान नाही तर मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मी निषेध करतो. या प्रकरणाची सभागृहाच्या सभापतींनी गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी. हर्षवर्धन सपकाळ यांना समज द्यावी. त्यांचे वक्तव्य तपासावे आणि हे वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी आणि सरकारविषयी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी.

‘मराठी अस्मितेला ठेच कशी?’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली तर मराठी अस्मितेला ठेच कशी पोहचते, असा सवाल करीत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचाही समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर मराठी अस्मितेला ठेच पोहचत नाही का, कोरटकर, सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्यावर बावनकुळे का बोलत नाहीत. मी सामान्य कुटुंबातून आलो आहे पण बावनकुळे, नारायण राणे यांनी मात्र माझ्यावर पातळी सोडून टीका केली आहे, यातून भाजपाचा खरा चेहरा पुढे आला आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader