NCP Hasan Mushrif ED Raid : ईडीने बुधवारी (११ जानेवारी) सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले. कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही करावाई करण्यात आली. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ईडी कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणं झालं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली.
हसन मुश्रीफ म्हणाले, “शरद पवार ब्रिजकँडी रुग्णालयात आहेत. त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. मी या कारवाईबाबत त्यांच्याशी बोलू शकलेलो नाही.”
“किरीट सोमय्यांनी नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांच्यावर कारवाईची भाषा केली. त्यामुळे विशिष्ट लोकांना लक्ष्य केलं जात आहे का असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या धर्मावरून लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलं,” असं हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं.
नक्की वाचा – ईडीने छापेमारी केलेल्या हसन मुश्रीफ यांची एकूण संपत्ती माहीत आहे का?
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
“माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू”, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : विश्लेषण : ईडी खरंच विरोधकांना लक्ष्य करते? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर
पुढे बोलताना ते म्हणाले, “दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली, याबाबत मला माहिती नाही. याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन.”