अनिश पाटील
मुंबईत टोळी युद्ध उफाळल्यानंतर १९८६ मध्ये देश सोडणारा दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात वास्तव्याला असल्याच्या चर्चा आहेत. दाऊदने पाकिस्तानातील मुक्कामही बदलला आहे. सध्या तो पाकिस्तानाची संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहतोय. एवढेच नाही तर दाऊदने पाकिस्तानात दुसरे लग्न केल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक माहिती दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) नुकतीच दिली. अ
दाऊद टोळीकडून दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत तपास करणाऱ्या एनआयएने आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्रात अली शाहच्या जबाबही समाविष्ट करण्यात आला होता. दाऊद सध्या कराचीत अब्दुला गाजीबाबा दग्र्याच्या मागील बाजूस असलेल्या रहीम फाकी परिसरातील संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहात आहे. एवढी वर्षे दाऊद डी १३, ब्लॉक-४, कराची डेवलपमेंट अथॉरिटी, स्कीम-५, क्लिफ्टन कराची येथे राहत होता. पण आता या नव्या पत्त्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. याशिवाय ३० स्ट्रीट- डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी, सौदी मशिदीजवळील व्हाईट हाऊस, कराचीमधील क्लिफ्टन, नूरबाद असे दाऊदचे पाकिस्तानातील पत्ते आहेत.
दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबीनने स्वत: तिचा भाचा अली शाह याला दाऊदच्या दुसऱ्या लग्नाची माहिती दिली. मेहजबीनच्या दाव्यानुसार, ६७ वर्षीय दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात एका पठाण मुलीशी दुसरे लग्न केले आहे. दरम्यान दाऊद इब्राहिमने त्याची पहिली पत्नी महजबीनला घटस्फोट दिल्याचा दावा केला आहे. पण तो धूळफेक करण्यासाठी पसरवण्यात आल्याचीही चर्चा आहे.
दाऊद सुरुवातीला दक्षिण मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर राहत होता. सुरुवातीला हाजी मस्तानसाठी काम करत होता. वडील पोलीस दलामध्ये असल्याचा धाक दाखवून दाऊद व्यापाऱ्यांकडून हफ्तेवसुली करायचा. ४ डिसेंबर १९७४ ला त्याने साथीदारांच्या मदतीने कर्नाक बंदर येथे एका व्यापाऱ्याला पावणेचार लाखाला लुटले. त्यात तो पकडला गेला. चार वर्षांची शिक्षा झाली. उच्च न्यायालयाकडून पुढे त्याला जामीन मिळाला. त्यानंतर आलमजेब, जहांगीरखान, सय्यद बाटला, मोहंमद इक्याल, मोहमद काल्या या गुंडांमध्ये पैशाच्या वाटपावरून फूट पडली. दाऊद आणि आलमजेब एकमेकांच्या जीवावर उठले. सय्यद बाटला, आयुब खान, मेहबूब खान ऊर्फ आयूब लाला यांच्या तस्करीच्या व्यवसायात ते दोघे भाऊ धुडगूस घालू लागले. १ जुलै १९७७ रोजी तर दाऊद आणि शाबीरने या आयूब लालाचे चक्क अपहरण केले होते. याच टोळीयुद्धातून १२ फेब्रुवारी १९८१ ला प्रभादेवीतील पेट्रोलपंपाजवळ दाऊदचा भाऊ शाबीर याची हत्या झाली. पुढे करीम लाला टोळीतील आमीरजादाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली. दाऊदचा मार्ग मोकळा झाला. यानंतर दोन वर्षांतरच दाऊदने मुंबईच नव्हे, तर अगदी दिल्ली, नेपाळपर्यंत आपले साम्राज्य पसरवले.
दाऊदने बडा राजनच्या मदतीने पठाण टोळीच्या आमीरजाद्याची हत्या घडवून आणली. पुढे दाऊद टोळीने १९८४ ला करीम लालाचा भाचा समदखान हत्या डवून आली. १९८५ लामध्ये पठाण टोळीचा आलमजेब पोलीस चकमकीत मारला गेला. मुंबई अधोविश्वावर दाऊद टोळीची एक हाती सत्ता निर्माण झाली. पुढे दाऊदने १९८६ मध्ये दुबई गाठली व तेथून सर्व टोळी हाताळू लागला. आता दाऊद पाकिस्तानात राहून त्याच्या कारवाया करत आहे.
सध्या सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट व आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान दाऊद टोळीचे मुंबईतील कामकाज सांभाळतात. आरिफ भाईजान हा पश्चिम उपनगरापासून अगदी विरापर्यंतचे दाऊद टोळीचा कामकाज पाहत आहे. आरिफ हा छोटा शकीलची धाकटी बहीण फेहमिदा हिचा पती आहे. २०२० मध्ये तिचे निधन झाले. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंडय़ा यांच्या हत्येनंतर २००६ मध्ये आरिफसह इतर नऊ जणांना दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. तेव्हापासून खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आरिफ भाईजानचे नाव अधूनमधून संशयित म्हणून चर्चेत यायचे. मुंबईतील दाऊद टोळीचे कामकाज सलीम फ्रूट हाताळत असल्याची चर्चा आहे.