मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विविध विकासकामाचं लोकार्पण करण्यात येत आहे. आज मुंबईतील बोरिवली येथील एका उड्डाणपुलाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संबंधित पुलाच्या श्रेयवादावरून उद्घाटनप्रसंगी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याची घटना घडली आहे. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
बोरिवली पश्चिम येथील उड्डाणपुलाचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुरू झालं होतं, आता शिवसेना या कामाचं श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. या उद्घाटनप्रसंगी भाजपाचे स्थानिक आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बॅनर लावून घोषणाबाजी केली. त्यामुळे सेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. पण घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं.
खरंतर, मुंबईतील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल होतात. या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बोरिवली पश्चिमेतील आर. एम भट्ट मार्ग येथे महापालिकेच्या वतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आलं. बोरिवली पश्चिमेतील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं.