देशातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून प्रतिष्ठित असलेल्या ‘जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थे’त अपारदर्शकता आणि वशिलेबाजीचा कहर झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लठ्ठ वेतनाच्या नोकऱ्यांची दारे खुली करून देणाऱ्या ‘कॅम्पस प्लेसमेंट’चे या वशिलेबाजीमुळे पुरते तीनतेरा वाजल्याचे विद्यार्थ्यांचेच म्हणणे आहे.
संस्थेच्या प्लेसमेंट व्यवस्थेवर काही ठरावीक विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिल्याने ते इतर विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांपर्यंत पोहोचूच देत नाहीत. परिणामी नोकरीच्या ‘क्रिमीलेअर’ संधी मूठभरांच्या खिशात जातात, अशी बहुसंख्य विद्यार्थ्यांची तक्रार आहे. या ‘फिक्सिंग’विरोधात आवाज उठवून ‘कॅम्पस प्लेसमेंट’मधील अन्याय दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी मार्च २०१३ मध्ये संस्थेकडे केली. पण, त्याची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही. एखाद्या बी-स्कूलमधील प्लेसमेंटबाबत विद्यार्थ्यांनीच तक्रार करण्याचा हा प्रकार दुर्मिळ व धक्कादायक आहे.
कुठल्याही व्यावसायिक शिक्षणसंस्थेचा ‘कॅम्पस प्लेसमेंट’ हा कणा असतो. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना यामुळे बडय़ा कंपन्यांची दारे खुली होतात. त्यामुळेच बजाजसारख्या अनुदानित सरकारी संस्थेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चढाओढ असते. अनेक मोठय़ा कंपन्याही महाराष्ट्रात कॅम्पस प्लेसमेंटसाठी येताना पहिली पसंती बजाजला देतात. पण, बजाजची नेमकी हीच व्यवस्था किडून गेली आहे.
अन्यत्र कॅम्पस प्लेसमेंटची व्यवस्था प्राध्यापक वा खासगी संस्थेकडून केली जाते. यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यल्प असतो. पण, बजाजमध्ये ही जबाबदारी विद्यार्थ्यांमधूनच निवडून आलेली समिती पार पडते. संस्थेचे दोन प्राध्यापक या व्यवस्थेवर देखरेख ठेवतात, असा दावा संचालक डॉ. कविता लघाटे करतात. पण, ही केवळ वरवरची देखरेख असते असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. प्लेसमेंट समितीतील विद्यार्थी ‘प्लेसकॉमर्स’ म्हणून ओळखले जातात. हेच विद्यार्थी प्रत्यक्षात प्लेसमेंटचे काम पाहतात. ही समिती औट घटकेची असली तरी प्लेसकॉमर्स आपल्या हातात आलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करीत मनमानी पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबवितात. हे प्लेसकॉमर्स आधी आपली व आपल्या मित्रमैत्रिणींची चांगल्या कंपन्यांमध्ये वर्णी लावून घेतात. त्यानंतर उरल्यासुरल्या कंपन्यांमध्ये इतर विद्यार्थ्यांना संधी दिली जाते, असा आरोप एका माजी विद्यार्थिनीने केला.

..तर ही सुविधाच बंद करू
गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट संबंधात तक्रारी केल्या होत्या. १२० विद्यार्थ्यांपैकी काही जणांना डावलले गेल्याचे वाटू शकेल. पण, प्लेसमेंट ही आमची जबाबदारी नाही. ही अतिरिक्त सुविधा आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील तर आम्ही ती देणे बंद करू.
-डॉ. कविता लघाटे, संचालक

Story img Loader