लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : टोरेस घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. अल्पेश घारा (५४) असे त्याचे नाव असून तो फसवणुकीतून मिळवलेली रक्कम विदेशात पाठवण्याचे काम करीत होता. अल्पेशला २१ जानेवारीपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, कांदिवलीतील टोरेस कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यातून २ तिजोऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्या तिजोरीतील तब्बल १६ लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखा कसून तपास करत असून तपासातून नवीन बाबींचा उलगडा होत आहे. तपास सुरू होऊन सुमारे दोन आठवडे होत आले असून कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. टोरेस प्रकरणातील फसवणुकीची रक्कम ८३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने १३ जानेवारी रोजी पोईसर भागातील टोरेसच्या सहाव्या कार्यालयावर छापा टाकला होता. गुन्हे शाखेने या कार्यालयातून २ तिजोऱ्या जप्त केल्या. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तिजोऱ्या उघडणे गुन्हे शाखेला शक्य होत नव्हते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला बोलावून तिजोऱ्या उघडण्यात आल्या. दोन्ही तिजोऱ्यांतील एकूण १६ लाख ८० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले.
आतापर्यंत ८३ कोटींची फसवणूक
टोरेसप्रकरणी आतापर्यंत ८३ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी २७ कोटी १३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले असून त्यात ६ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड, ४ कोटी ५३ लाख रुपये किमतीच्या दागिने आणि बँक खात्यात १५ कोटी ८४ लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले.