मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येणारे ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. संगीत सेवेबद्दलचा पुरस्कार पंढरीनाथ कोल्हापुरे आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना जाहीर झाला आहे.
लता मंगेशकर यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या वर्षांपासून ‘पत्रकारिता’ क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार सुरू करण्यात आला असून या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ व अनंत दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे.
मंगेशकर यांच्या ‘प्रभुकुंज’ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस उषा मंगेशकर, आदीनाथ मंगेशकर आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीराम गोगटे उपस्थित होते. उत्कृष्ट नाटय़निर्मितीसाठीचे ‘मोहन वाघ पारितोषिक’ ‘छापा-काटा’ या नाटकास जाहीर झाले आहे. तर सामाजिक क्षेत्रासाठीचा ‘आनंदमयी पारितोषिका’साठी मिरज येथील खरे वाचन मंदिराची निवड करण्यात आली आहे. नाटय़ आणि चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दलचे मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पारितोषिक ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि ऋषी कपूर यांना जाहीर झाले आहे. साहित्य क्षेत्रासाठीच्या ‘वाग्विलासिनी’ पारितोषिकासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर सामाजिक सेवेबद्दलचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी १ लाख १ हजार १ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच २४ एप्रिल रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे आदीनाथ मंगेशकर यांनी सांगितले.
२५ एप्रिल रोजी आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात सादर करणार आहेत.

उद्धव-राजच्या कौटुंबिक वादात पडायचे नाही- लता मंगेशकर
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना काय खायला दिले यावरून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील वादावर मी काहीही बोलणार नाही किंवा कोणताही सल्लाही देणार नाही. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, असे लता मंगेशकर यांनी रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.
लता मंगेशकर म्हणाल्या की, बाळासाहेब आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यांनी मला आपली मुलगी मानले होते. पण राजकारण या विषयावर आम्ही कधीच बोललो नाही. राजकारणातील अनेक व्यक्तींशी आपले व्यक्तिगत संबंध आहेत, मात्र त्यांच्याशीही आपण राजकारण या विषयावर कधीही बोलत नाही. एकूणच राजकारणाबद्दल मला फारच कमी माहिती असल्याने राजकारणापासून मी दूरच आहे. पण आपल्या देशाला चांगल्या प्रकारे सांभाळेल आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल, अशा व्यक्तीचे सरकार यावे. मात्र देशात सध्या जे सुरू आहे,ते पुन्हा नको, असे कॉंग्रेस पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लतादीदी म्हणाल्या, आणि मोदी यांना दिलेल्या आशीर्वादावरून उठलेल्या वादावरही पडदा टाकला..

लता मंगेशकर उवाच..
*अगणित लहानमोठे पुरस्कार मिळाले. पण रसिकांचे प्रेम हा सर्वोच्च पुरस्कार
*‘सीआयडी’ मालिका आणि मालिकेतील शिवाजी साटम यांच्यासह सर्वच कलाकार माझ्या आवडीचे आहेत. आमच्या घरी गणपतीला ते दरवर्षी येतात.
* अण्णा हजारे यांनी जनसेवा केली आहे. अण्णा हजारे म्हणजे सरळ आणि साधी व्यक्ती आहे.
* चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अमिताभ बच्चन यांनाही फाळके पुरस्कार मिळावा.
*सचिन तेंडुलकरला खूप पुरस्कार मिळाले आहेत, मिळत आहेत. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारासाठी सध्या तरी त्यांच्या नावाचा विचार केला नाही.

Story img Loader