राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी त्यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला महिनाभरात निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी कणकवली न्यायालयाला दिले.
कणकवली न्यायालयात राणे यांनी दाखल केलेला अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांच्यासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.
खटल्याची सुनावणी रोज घेण्याची आणि कुठल्याही कारणास्तव ती पुढे ढकलू नये, असेही आदेश देताना स्पष्ट केले. राणे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव सुनावणीसाठी हजर राहत नाहीत. एवढेच नव्हे, तर सतत गैरहजर राहण्याची आणि सुनावणी तहकूब करण्याची विनंती राणे यांच्याकडून केली जाते. परिणामी गेल्या सात वर्षांपासून खटल्याचे कामकाज ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध दाखल हा खटला रद्द करण्याची मागणी राऊत यांनी केली.
२००६ मध्ये राणे यांनी हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. ‘सामना’मध्ये राणे भ्रष्टाचारी असून गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असल्याचा आरोप करून त्याबाबत लिखाण करण्यात आले होते.

Story img Loader