वर्सोवा- घाटकोपर मेट्रो रेल्वेचे तिकीटदर काय असावेत, याचा निर्णय आता बहुधा १३ जून रोजी लागण्याची शक्यता आहे. या दरांसंबंधीचा वाद उच्च न्यायालयात गेला असून सोमवारी त्यावर सुनावणी झाली. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. यासंदर्भातील पुढील सुनावणी १३ जून रोजी होणार आहे.
वर्सोवा-घाटकोपर असे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी दिमाखदार उद्घाटन झाले. मात्र उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच मेट्रोच्या तिकीट दरावरून एमएमआरडीए आणि एमएमओपीएल यांच्यातील वाद उघडकीस आला. तिकीट दरांबाबत करारातील अटींचे एमएमओपीएलने उल्लंघन केल्याचा दावा करीत त्या विरोधात एमएमआरडीने उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच त्यावर सुनावणी होणार असल्याची माहितीही दिली.
तिकीट दरवाढ वादाप्रकरणी लवाद नेमण्याची आणि तिकीट दरवाढीला स्थगिती देण्याची तसेच अंतरिम दिलासा देण्याबाबत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी एमएमआरडीने सोमवारी याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने तूर्त कुठलाही अंतरिम दिलासा न देता त्याबाबतची सुनावणी १३ जून रोजी ठेवली आहे. एमएमआरडीएने या प्रकरणी प्रकल्प भागधारक मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल) आणि अनिल अंबानी संचालित रिलायन्स इन्फ्रा यांना प्रतिवादी केले आहे.
लवाद आणि कन्सिलेशन कायद्याच्या कलम ९ नुसार करार करणाऱ्यांमध्ये कुठल्याही मुद्दय़ावर वाद निर्माण झाला असेल तर त्याला विरोध करणारा कराराच्या कुठल्याही टप्प्यावर म्हणजेच आधी, दरम्यान किंवा नंतर अंतरिम दिलासा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. एमएमआरडीएनेही याच कलमाचा आधार घेत मेट्रोच्या तिकीट दरवाढीवरून रिलायन्स इन्फ्राविरोधात उच्च न्यायालयात
धाव घेतली आहे.
प्रकल्प सुरू करताना किमान ९ रुपये ते कमाल १३ रुपये असा दर मेट्रोच्या तिकिटासाठी निश्चित करण्यात आला होता, असे एमएमआरडीएने याचिकेत म्हटले आहे. तर ‘बेस्ट’च्या तिकिटाच्या दीडपट दर मेट्रोच्या तिकिटाचा असेल या तत्त्वानुसार आताच्या ‘मेट्रो’साठी दहा रुपये ते ३८ रुपये इतका दर होतो. त्यामुळे तिकीट १० ते ४० रुपयांपर्यंत असावे असे ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’चे म्हणणे आहे.
आता पहिल्या महिनाभरासाठी १० रुपयांच्या सवलतीच्या दराने तिकीट आकारण्यात येणार आहे. त्यानंतर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ४० रुपये असे टप्प्यानुसार तिकीट दर असतील असे मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.