सर्वपक्षीय १३ नगरसेवकांचा समावेश; आयुक्तांचे आदेश धाब्यावर

नगरसेवकांच्या नालेसफाई ‘पर्यटना’त परवानगी घेतल्याशिवाय सहभागी व्हायचे नाही, अशी कडक ताकीद पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली असतानाच भांडुपमध्ये मात्र पालिका अधिकारीच नगरसेवकांना घेऊन आरोग्यविषयक जनजागृतीला निघाले आहेत.

सध्या शहरात ठिकठिकाणी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक नालेसफाई पर्यटनाचा आनंद लुटत प्रसारमाध्यमातून झळकण्याचीही संधी साधत आहेत. नगरसेवकांच्या वरचेवर होणाऱ्या या पर्यटनात पालिका अधिकाऱ्यांनाही सहभागी करवून घेतले जात असल्याने आयुक्तांनी अखेर आपल्या परवानगीशिवाय यात सहभागी व्हायचे नाही, असे बजावले. परंतु, आयुक्तांचे ‘लेखी’ आदेश अद्याप भांडुपमधील प्रभाग कार्यालयात बहुदा पोहोचलेले नाहीत. कारण, येथील अधिकाऱ्यांनी नगरसेवकांनाच सोबत घेत आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे ठरविले आहे.

‘एस’ विभाग कार्यालयातील आरोग्य अधिकारी जितेंद्र जाधव यांनी एक शक्कल लढविली आहे. आणि यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांच्या १२ आणि एक अपक्ष अशा एकूण १३ नगरसेवकांना सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागामध्ये पालिका अधिकाऱ्यांसोबत फिरायचे आहे. डास निर्मूलन, जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यावी, डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजनांना नागरिक दाद देत नाहीत. त्यामुळे नगरसेवकांच्या ‘जनसंपर्का’चा फायदा उठविण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा विचार आहे.

..म्हणून अटकाव नाही

या मोहिमे दरम्यान भांडूप परिसरात १४ ठिकाणी डेंग्युच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने आढळली असून डासांच्या उत्पत्तीस्थानांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र पुन्हा तेथे डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कीटनाशक अधिकाऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्या याची माहिती रहिवाशांना दिली. रहिवाशांनी याकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन स्थानिक नगरसेवकांनीही यावेळी केले. एरवी घराची अथवा आसपासच्या परिसरात पाहणी करण्यास रहिवाशी अधिकाऱ्यांना अटकाव करतात. मात्र नगरसेवक सोबत असल्यामुळे अधिकाऱ्यांना डास निर्मूलनाची मोहिमही यशस्वीपणे राबविणे शक्य झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ही मोहीम मे महिन्यात राबवायची होती. परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण गावाला गेल्यामुळे घर बंद असते. परिणामी, जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये याची माहिती रहिवाशांना देता येत नाही. त्यामुळे ही मोहीम उशीरा हाती घेण्यात आली. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे जलजन्य आजारांविरोधात पूर्ण क्षमतेने जनजागृती करण्यास मदत होत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचे प्रमाण आटोक्यात राहील. पावसाळ्यात ताप आल्यास घरच्या घरी उपचार न करता तात्काळ दवाखान्यात जावे.

– डॉ. जितेंद्र जाधव, आरोग्य अधिकारी, ‘एस’ विभाग कार्यालय

Story img Loader