मुंबईमधील नि:समर्थ आणि दिव्यांग (अपंग) यांच्या सर्वेक्षणाचे काम पालिकेने हाती घेतले असून त्यासाठी पालिका विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना कर्मचारी उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र बहुसंख्य साहाय्यक आयुक्तांनी विभाग कार्यालयांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर या कामाची जबाबदारी सोपवून हात झटकले आहेत. तर काही ठिकाणी आरोग्य स्वयंसेविकांना या कामास जुंपण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची आबाळ होण्याची शक्यता आहे.
एकूण लोकसंख्येत अपंगांची संख्या तीन ते चार टक्के आहे. मात्र आता जन्म-मृत्यू नोंदणीप्रमाणे अपंगांची गणना करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबईतील अपंगांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. अलीकडेच अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या मुख्य उपस्थितीत पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईत १ ते १५ एप्रिल या काळात अपंगांचे सर्वेक्षण करण्याचे आणि हे काम विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांकडून करून घेण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. या कामासाठी स्वतंत्र कर्मचारी भत्ता, स्वतंत्र साधनसामग्री किंवा मानधन देण्यात येणार नाही, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. विभाग कार्यालयातील आपली नियमित कामे अडू नयेत म्हणून साहाय्यक आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांवर ही कामे ढकलली आहेत. त्याचबरोबर आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी आणि महिना केवळ चार हजार रुपये मानधनावर अनेक आरोग्यविषयक कामे घरोघरी फिरून करणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांवर ही कामे सोपविण्यात आली आहेत. पावसाळा जवळ येत असल्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे कर्मचारी वेगवेगळ्या कामांत व्यस्त आहेत. त्यातच उन्हाळ्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच १ ते १५ एप्रिल या काळात अपंगांचे सर्वेक्षण करण्याचे काम हे कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांच्या अंगावर पडले आहे. एका वेळी आपण एकच काम करू अशी भूमिका कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांनी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच घरोघरी फिरून रुग्ण शोधणे, आजरी रुग्णांना उपचार घेण्यासाठी वैद्यकीय केंद्रात आणणे, कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देणे, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून पाण्याच्या पिंपात कीटकनाशक औषध टाकणे आदी कामांना खीळ बसण्याची चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा