मुंबई : वातावरणाच्या लहरीपणामुळे कधी गारठा, तर कधी उकाडा असा अनुभव सध्या मुंबईकरांना येत आहे. ऐन थंडीच्या कालावधीत विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गच्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांत जात आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत पहाटे गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातही काहीशी अशीच परिस्थिती होती. मुंबईकरांना यंदा दरवर्षीसारखा गारठा अनुभवता आलेला नाही. थंडीच्या हंगामात फारच कमी वेळा १३ ते १६ अंशादरम्यान किमान तापमान नोंदले गेले. याउलट किमान तापमानही अनेकदा वाढतच गेले होते. किमान आणि कमाल तापमानामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळेच सध्या अबालवृद्ध सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत. दिवसेंदिवस तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाचा प्रचंड त्रास होत आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला होता. मुंबईत सध्या दुपारच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऋतुबदलाच्या या काळात सध्या पहाटे गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी तापत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अजूनही किंचित गारवा आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानातही वाढ होत आहे. दरम्यान, तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ऋतुमानाचे चक्र बिघडले

मुंबईत यंदा हिवाळा फारसा जाणवलाच नाही. ऑक्टोबरनंतर पहाटे आणि रात्री जाणवणाऱ्या बोचऱ्या थंडीपासून शहर दूरच राहिले. एरवी कडाक्याच्या थंडीत नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या मुंबईकरांना यंदा मात्र ऋतूमानाच्या बदललेल्या चक्राला सामोरे जावे लागले. फेब्रुवारीच्या मध्यावरच उकाडा जाणवू लागल्याने यंदाचा उन्हाळा कसा असणार याची चिंता मुंबईकरांना आता सतावू लागली आहे.

उन्हामुळे होणारा त्रास

उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते.

उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे कराल

ऊन जास्त असल्यास भरपूर पाणी प्यावे.
उन्हाळ्यात शरीराला ताण देणारे व्यायाम करू नयेत.
हलके, फिकट रंगाचे आणि सैलसर कपडे घालावे.
जेव्हा तापमान जास्त असेल तेव्हा सावलीत बसावे.

उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे

संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे.
शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ प्यावे.

Story img Loader