तेल, रासायनिक कंपन्याच्या प्रदूषणामुळे रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारी
तेल आणि रासायनिक कंपन्यांचा शेजार लाभलेल्या माहुलवासीयांचे जगणे अस्वच्छता, गैरसोयी आणि मुख्य म्हणजे प्रदूषित हवेमुळे असह्य़ बनले आहे. एकमेकांना खेटून असलेल्या येथील इमारतींत दिवसाही सूर्यप्रकाशाला थारा नसतो. त्यामुळे श्वसनाच्या आणि त्वचेच्या विकारांनी हे रहिवाशी ग्रासले आहेत.
आयआयटी, केईएम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींनी केलेल्या विविध पाहणीत वारंवार माहुलमधील प्रदूषणावर बोट ठेवण्यात आले आहे. आजही माहुलवासीयांचा प्रश्न न्यायालयाच्या दरबारात अधूनमधून उठत असतो; परंतु पालिका, राज्य सरकार अशा सर्वच यंत्रणा त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाय योजण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्यातच दंग आहेत.
मुंबईत विविध विकास प्रकल्पांमध्ये घर गमावणाऱ्या कुटुंबांसाठी ‘एमएमआरडीए’ने माहुल गावात ७२ इमारती बांधल्या आहेत. आज येथील संकु लांमध्ये सुमारे ६ हजार प्रकल्पबाधित कुटुंबे वास्तव्यास आहेत. यामध्ये विद्याविहार येथील १,२००, तानसा पाइपलाइन सायकल ट्रॅक प्रकल्पातील १०००, वांद्रे येथील ४५० आणि उर्वरित कु टुंबे घाटकोपर, कुर्ला, पवई या भागांतील आहेत. मात्र इथल्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले इथले रहिवासी पुन्हा एकदा विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. आम्हाला या नरकात राहायचे नाही, आम्हाला इतरत्र घरे द्या, अशी या रहिवाशांची मागणी आहे.
माहुलमध्ये १६ रसायन आणि ३ तेल कंपन्या आहेत. या कंपन्यांमुळे इथले हवा-पाणी कायम प्रदूषित असते. प्रदूषित हवेमुळे रहिवाशी कायम अस्थमा, खोकला यांसारख्या श्वसनाच्या विकारांनी तसेच डोळे चुरचुरणे आणि डोकेदुखी आदींनी त्रस्त असतात, असे रहिवाशी अनिता ढोले यांनी सांगितले. माहुलवासीयांच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे २०१५ मध्ये केईएम रुग्णालयाने या ठिकाणी तपासणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार माहुलमध्ये खोकल्याने त्रस्त असलेल्यांची संख्या २१.८ टक्के होती, तर श्वसनाच्या आजारांनी ३४.५ टक्के आणि डोळे चुरचुरणे- डोकेदुखीच्या समस्येने ५०.९ टक्के माहुलवासीय त्रस्त होते. महत्त्वाचे म्हणजे या तपासणीनंतरही अनेक प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर या ठिकाणी करण्यात आले.
मुंबई आयआयटीने पाण्याच्या टाक्यांतून घेतलेल्या नमुन्यांमध्येही तेलाचा तवंग होता. आयआयटीने अहवाल गेल्याच वर्षी सादर केला. तेल, रसायनमिश्रित पाण्यामुळे येथे अनेक जणांना कावीळसारखे आजार व त्वचाविकार होत असल्याचे संतोष पाष्टे या रहिवाशाने सांगितले.
वायूविजनाचा अभाव
इथल्या इमारतीही इतक्या दाटीवाटीने उभ्या आहेत की हवा, सूर्यप्रकाश यांना वावच राहत नाही, अशी तक्रार इमारत क्रमांक ३ मधील रहिवाशी रेश्मा शिंदे यांनी केली. अनेक घरांमध्ये दिवसाही अंधाराचे साम्राज्य असते, असे त्यांनी सांगितले. हवा खेळती नसल्याने क्षय रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्या म्हणाल्या. आयआयटीच्या अहवालात येथील इमारतीच्या एकूणच रचनेबाबत ताशेरे ओढले आहेत. इमारतींची रचना पर्यावरणीय दृष्टिकोनातून केली नसल्याचा आयआयटीचा आक्षेप आहे.
सांडपाणी रस्त्यावर
इथल्या अस्वच्छतेमुळेदेखील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक इमारतींच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे परिसरात सांडपाणी साचलेले असते. सांडपाणी साचून राहिल्याने त्यावर डासांची उत्पती होते. शिवाय परिसरात दरुगधीचे वातावरण पसरते, असे रहिवाशी जयवंत अमृसकर यांनी सांगितले. सांडपाणी आणि पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या शेजारीच असल्याने सांडपाणी त्यात मिसळते, असेही आयआयटीच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळेच इथल्या रहिवाशांमध्ये आरोग्यविषयक समस्या उद्भवत असतात.