संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : अपघात असो की बाळंतपण, बहुतेक वेळा रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते ती रुग्णवाहिका. आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने गेल्या नऊ वर्षांत तब्बल ८३ लाख ६७ हजार ५३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून जीव वाचविण्यात मोलाची मदत केली आहे. यात ग्रामीण व दुर्गम भागात बाळंतपणासाठी मातांना रुग्णालयात घेऊन जाताना ३८,७२२ मातांची बाळंतपणे रुग्णवाहिकेत झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नुसत्या करोनाकाळात सहा लाखांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याची कामगिरी आरोग्य विभागाच्या या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका सेवेचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हाती घेतली असून यात दुर्गम आदिवासी भागाचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईसारख्या शहरांमध्येही करोना रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे दुरापास्त झाले होते. बहुतेक खासगी तसेच राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या रुग्णवाहिकांनी आपले काम बंद ठेवणेच पसंत केल्यामुळे करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांचे अतोनात हाल झाले होते. त्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अनेक खासगी तसेच राजकीय पक्षांशी संबंधित रुग्णवाहिका शहरात अवाच्यासवा रक्कम घेऊन रुग्णांची लूटमार करण्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाला रुग्णवाहिकांचे राज्यव्यापी दर निश्चित करण्याबाबत आदेश जारी करावा लागला होता. या काळताही आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा कार्यरत होती. २०२० मध्ये तब्बल चार लाख २९ हजार १४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर २०२१ मध्ये एक लाख ६३ हजार ६३५ रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बीव्हीजेच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून ९३७ रुग्णवाहिका राज्यभर चालविल्या जातात. यात २३३ रुग्णवाहिका या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेत मोठी वैद्यकीय मदत मिळू शकली आहे. २०१४ ते डिसेंबर २०२२ या काळात सुमारे ८३ लाख ६७ हजार रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांपैकी अपघातामधील रुग्णांची संख्या चार लाख ८८ हजार ७२३ एवढी होती. विविध ठिकाणच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या ७३ हजार ६६ एवढी होती. वैद्यकीय कारणांसाठी चार लाख ८९ हजार रुग्ण तर बाळंतपणासाठी १४ लाख ८१ हजार २३८ मातांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ६,२६२ जणांना तर साप-विंचू चावून विषबाधा झालेल्या दोन लाख एक हजार ४४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची कामगिरी या रुग्णवाहिकेने बजावली आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कुंभमेळा, गणेशोत्सव, पंढरपूर वारी तसेच दरडी कोसळण्याच्या घटनांत तसेच पूरस्थितीत मोलाची कामगिरी बजाविल्याचे आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या काळात एक लाखाहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल केले, तर मागील काही वर्षांत पंढरपूर वारीदरम्यान दोन लाख ६६ हजार वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करून जीव वाचविण्यास मदत केली. याशिवाय आरोग्य विभागाने १०२ या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जननी-शिशू कार्यक्रमांतर्गत एक वर्षापर्यंतच्या बालकांना तसेच गर्भवती महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे तसेच परत घरी सोडण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मागील आठ वर्षांत जवळपास ४० लाखांहून अधिक माता व बालकांना या रुग्णवाहिका सेवेचा लाभ झालेला आहे.

ग्रामीण व दुर्गम भागांत प्रभावी आरोग्यसेवा देण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रुग्णावाहिका सेवेचा विस्तार करण्याची योजना हाती घेतली असून लवकरच याबाबतचे धोरण जाहीर केले जाईल, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

Story img Loader