मुंबई:  दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांना मानसिक आधार देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून, पॅलिएटीव्ह केअर केंद्रांमार्फत त्यांच्यावर विशेष उपचार केले जात आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाच्या पॅलिएटीव्ह केअर केंद्रांमध्ये गेल्या वर्षभरात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या २,५५,४६४ रुग्णांची सेवा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांचावर मोठ्या प्रमाणात विशेष उपचार करण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रमाच्या माध्यमातून पॅलिएटीव्ह केअर केंद्रांमार्फत अशा रुग्णांवर विशेष उपचार करण्यात येतात. आरोग्य विभागाच्या पॅलिएटीव्ह केअर केंद्रांमध्ये गेल्या वर्षभरात म्हणजे २०२३-२०२४ मध्ये बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण विभागामध्ये आलेल्या  १,०४,०९७, आधीपासून उपचार घेणारे तर ३६,७९७, गृह भेटीद्वारे तसेच ६३,०१९  मानसिक- सामाजिक हस्तक्षेप आणि एनपीपीसी सेवाअंतर्गत ५१,५६१ अशा एकूण २,५५,४६४ रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. सन २०२२-२०२३ मध्ये बाह्य रुग्ण आणि आंतर रुग्ण विभागामध्ये ४४९३१ एवढ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले यात आधीपासून उपचार घेणारे ११७६३एवढे रुग्ण होते तर गृह भेटीद्वारे  १२६०२ एवढ्या रुग्णांवर उपचार केले गेले. याशिवाय तर मानसिक आधार योजनेअंतर्गत ४१,८८९ अशा एकूण १,१०,९८५ रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली.

हेही वाचा >>>ठाण्यातील माजीवाड्यात म्हाडा बांधणार सात मजली वृद्धाश्रम; नोकरदार महिलांसाठी वसतीगृही बांधणार

राज्यात पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रमांतर्गत दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण शोधून त्यांना आरोग्य सेवा पुरविली जाते. अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते. अशा रुग्णांचे समुपदेशन, मॉर्फिन आणि औषधांचा पुरवठा आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रांमधून केला जातो. आरोग्य सेवेसाठी दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी १०४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

दीर्घ काळापासून किंवा मोठ्या दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी, तसेच कुटुंबियांचे त्रास कमी करण्यासाठी घेतलेली काळजी म्हणजे पॅलिएटिव्ह केअर. दीर्घ काळ असणाऱ्या व शारीरिक अपंगत्व आणणाऱ्या व्याधी त्रासदायक असतात. शारीरिक समस्यांसोबतच सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि अध्यात्मिक त्रासांनाही सामोरे जावे लागते. पॅलिएटिव्ह केअर हे वैद्यकीय शास्त्रातील असे क्षेत्र आहे जे दुर्धर आजारावर इलाज करीत नसून, या रुग्णांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करते. वेदना व इतर लक्षणापासून आराम पुरविण्याबरोबरच यामध्ये मानसिक वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस दुर्धर आजारांच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. युनिसेफ इंडिया नुसार भारतामध्ये पॅलिएटिव्ह केअरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या अंदाजे ४ कोटी आहे.

हेही वाचा >>>न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी

केंद्र शासनाच्या पॅलिएटीव्ह धोरणाअंतर्गत महाराष्ट्रात सन २०१२ मध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सन २०१३-१४ मध्ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, वर्धा व वाशिम आणि सन २०१४-१५ सातारा व नंदुरबार या जिल्हयांमध्ये कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. सन २०१८-१९ च्या मंजुर पीआयपीमध्ये सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक, परभणी, जालना, पालघर, रत्नागिरी, नांदेड आणि उस्मानाबाद या ९ जिल्ह्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला. सन २०२१-२२ च्या अंमलबजावणी कृती आराखडयामध्ये नागपूर, औरंगाबाद, जळगांव, लातूर, बीड, हिंगोली, ठाणे व अहमदनगर या ८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर सन २०२२-२३ च्या प्रकल्प अंमलबजावणी कृती आराखड्यामध्ये अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, रायगड, गोंदिया, धुळे, सोलापूर, या ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रमामध्ये मुख्यतः आयुष्याच्या शेवटच्या टप्यातीत बरे न होणाऱ्या रुग्णांचा समावेश होतो. या रुग्णांना उपचारात्मक चिकित्सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्साच उपयुक्त असते. तसेच कुटुंबातील लोकांनाही मानसिक आधाराची गरज असते. पॅलिएटिव्ह केअर कॅन्सर, पक्षाघात, एचआयव्ही /एड्स औषधीने न बरे होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृद्धापकाळाने अपंगत्व आलेले किडनी विकार, लिव्हर विकारग्रस्त आदी रुग्णांना दिली जाते. राज्यामध्ये सदर कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावर स्टेट पॅलिएटीव्ह केअर सेल कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तसेच १७ जिल्ह्यांमध्ये जिल्हा स्तरावर पॅलिएटीव्ह केअर क्लिनिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहेत. त्यापैकी ८ जिल्ह्यांत आवश्यक एक प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, चार पिचारिका व एक मल्टी टास्क वर्करची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये एनसीडी कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आठवड्यातील निश्चित केलेल्या दोन दिवसीय जिल्हा रुग्णालयातील बाहय रुग्ण विभागात रुग्णांची तपासणी करणे तसेच आंतरुग्णांना सेवा देणे व उर्वरित निवडलेल्या तालुक्यातील रुग्णांना गृहभेटी मार्फत सेवा देणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत ७,८९,५९५ वृद्धांना आरोग्य विभागाने आरोग्य सेवा पुरविली आहे.  यात बाह्य रुग्ण विभागात नव्याने आलेले रुग्ण, वार्डमध्ये दाखल करण्यात आलेले रुग्ण, पुनर्वसन सेवा, प्रयोगशाळा सेवा तसेच गृहभेटी दरम्यान अशा प्रकारच्या सेवांचा समावेश आहे.

आरोग्य विभागामार्फत जेजे हॉस्पिटल, मुंबई येथे ३० खाटांचे प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्र, चार जिल्ह्यांमध्ये वृद्धांना समर्पित १० खाटांचे वृद्ध वार्ड स्थापन करण्यात आलेले आहेत. आणखी पाच जिल्ह्यांमध्ये असे वार्ड स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हा रूग्णालयात १० खाटा वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राखीव आहेत यात पाच बेड  पुरुष, पाच बेड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारने १२ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक महामंडळा’ची स्थापना केली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पॅलिएटीव्ह केअर केंद्रांमधील सेवांचा तसेच वृद्धापकाळ आरोग्य सेवांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू  रंगा नायक, डॉ. स्वप्नील लाळे, संचालक मुंबई यांनी केले आहे. दुर्धर आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात पॅलिएटीव्ह सेवेचा अधिक परिणामकारक विस्तार करण्याची आमची योजना असल्याचे मिलिंद मैसकर यांनी सांगितले.