मुंबई : देशातील कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य विभागातील बालरोग तज्ज्ञांची दीर्घकाळापासून रिक्त असलेली पदे मोठा अडथळा ठरली आहेत. रुग्णसेवेवर होणार परिणाम लक्षात घेता आरोग्य विभागाने प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका व प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशाने ऑन्कोलॉजी व पेडियाट्रिक शाखेत पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका आणि बालरोग तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यात असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक राष्ट्रीय कार्यक्रम सुरु असून त्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, आणि दैनंदिन शुश्रुषा केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र सध्या आरोग्य विभागांतर्गत एकही कर्करोग तज्ज्ञ परिचारिका तसेच ऑन्कोलॉजी परिचारिका पदविका प्रशिक्षण केंद्र कार्यरत नाही. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्यासाठी कामा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या अभ्यासक्रमाला दरवर्षी वीस विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब कल्याण कार्यक्रमातंर्गत माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे तसेच माता व नवजात बालकांचे आरोग्यमान उंचावण्याकरीता विविध योजना, कार्यक्रम राबविण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत परिचारिकांकडून महिलांना समुपदेशन, उपचार व प्रशिक्षण देण्यात येते. मात्र सध्या राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत जे.जे. रुग्णालयातील परिचर्या शिक्षण संस्थेमध्ये पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रीक अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या अभ्यासक्रमाच्या २० जागा असून, त्यातील पाच जागा या आरोग्य विभागासाठी राखीव आहेत. तरीही आरोग्य विभागाकडे पुरेशा बालरोगतज्ज्ञ परिचारिका नसल्याने अनेक पदे दीर्घकाळ रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याने बीड जिल्हा रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्रांतर्फे पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग हा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या अभ्यासक्रमाला दरवर्षी ३० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

प्रवेश कुणाला?

सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम) किंवा बीएस्सी नर्सिंग उत्तीर्ण नोंदणीकृत परिचारीका या अभ्यासाक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील परिचारिकांना संस्थास्तरावर प्रवेशास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य उमेदवारांना सीईटीमार्फत प्रवेश देण्यात येणार आहे. शैक्षणिक शुल्कातून खर्च पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑनकोलॉजी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा इन पेडियाट्रिक नर्सिंग हे पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी लागणारा खर्च व इतर खर्च हा उमेदवारांकडून जमा होणाऱ्या शैक्षणिक शुल्कातून भागविण्यात यावा, असे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.