संदीप आचार्य
नवरात्रौत्सवापासून राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरु झालेल्या ‘ माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’त आतापर्यंत सुमारे १ कोटी ४ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मात्र या महिला आरोग्य तपासणी अभियानात महापालिका उदासीन असल्याचे दिसून येते. मुंबई महापालिकेने त्यांच्या परिक्षेत्रात केवळ २.२ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर नाशिक, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकांनी अवघ्या चार टक्के महिलांची आरोग्य विषयक तपासणी केली आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. यात राज्यातील तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून महापालिकांचा सहभाग मोलाचा मानला जातो. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत महापालिका परिक्षेत्रातील एक कोटी ५३ लाख ६६ हजार ६३४ महिलांपैकी केवळ २० लाख ९४ हजार ९०४ महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास केवळ १३.६३ टक्के महिलांची आरोग्य तपासणी झाली आहे. त्याचवेळी राज्यात अन्यत्र आरोग्य विभागाने एक कोटी चार लाख ३६ हजार ९४१ महिलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. म्हणजे २२.४ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही या आरोग्य तपासणी मोहीमेमागची संकल्पना असताना राज्यातील महापालिकांकडून याबाबत ज्या कुर्मगतीने काम सुरू आहे त्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेसरखी सक्षम आरोग्य यंत्रणा असणार्या महापालिकेने आतापर्यंत केवळ २.२ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे तर नाशिक, पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेत अवघी ४ टक्के महिला आरोग्याची तपासणी झाली आहे. नांदेड व नागपूर महापालिका क्षेत्रात ८ टक्के तर ठाणे महापालिका क्षेत्रात १५.६ टक्के महिलांच्या आरोग्याची तपासणी झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. महिलांच्या आरोग्याची तपासणी वेगाने पूर्ण करण्यास तसेच चाचणीत आजार दिसून आल्यास तात्काळ उपचाराची व्यवस्था करण्यास तानाजी सावंत यांनी सांगितले.
राज्यात १८ वर्षावरील महिला, माता, गर्भवती यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक २६ सप्टेंबर पासून आरोग्य तपासणी कार्यक्रम एकात्मिक बाल विकास विभाग , व इतर विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. सर्व महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैदयकिय अधिकारी आणि स्ञीरोगतज्ञामार्फत तपासणी , औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. आशा व अंगणवाडी आरोग्य सेविका व सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, काननाकघसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे व महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्ञक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच भरारी पथका मार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेञात येणार्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत.राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात येत आहेत.
आतापर्यंत एकूण एक कोटी चार लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यात ३० वर्षावरील ९३८७१ महिलांना मधुमेह तर १,५५,७०७ महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे प्राथमिक निदानातून आढळून आले.
एकूण दहा लाख गरोदर मातांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ४५,७३२ मातांना उच्च रक्तदाब आढळून आला तीव्र रक्तक्षय असलेल्या ३८,५०९ मातांना आयर्न सुक्रोज देण्यात आले १,००३९१ मातांची सोनोग्राफी करण्यात आली. तीस वर्षावरील १२००७ महिलांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले तर २०४६३ लाभार्थ्यांना कर्करोगची संशयित लक्षणे आढळून आले. जवळपास २६ लाख लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य विषयक व तंबाखू सेवन करु नये याबाबत समुपदेशन करण्यात आले. या महिला आरोग्य तपासणीत वजन, उंची, रक्त चाचणी, मधुमेह, रक्तदाब तपासणीपासून ह्रदयरोग व कर्करोग विषयक तपासणी करण्यात येत असून आरोग्य विषयक समुपदेशन केले जाते असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.