विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची विनंती केंद्राला करणार – तावडे
‘नीट’मधून तोडगा काढण्यासाठी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (१६ मे) नवी दिल्लीत बोलाविली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ‘नीट’च्या सक्तीतून दिलासा देण्यासाठी पावले टाकावीत, अशी विनंती पुन्हा बैठकीतही केंद्र सरकारला केली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
‘नीट’च्या सक्तीतून वगळून राज्य सरकारने घेतलेल्या प्रवेशपरीक्षेच्या आधारे वैद्यकीय व दंतवैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, अशी राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने पेच उभा राहिला आहे. त्याबाबत फेरविचार करणाऱ्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालयाची उन्हाळी सुटी सुरू होत असून सुटीकालीन न्यायमूर्तीपुढे त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनेही प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घ्यावी यासह काही मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयाचे दार पुन्हा ठोठावले आहे. न्यायालयीन पातळीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असताना केंद्र सरकारने नवीन अधिसूचना जारी करावी यासाठी अनेक राज्य सरकारांनी दबाव आणला आहे. लाखो पालक व विद्यार्थी चिंतेत असताना त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, अन्यथा त्यातून अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, हे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
‘नीट’सामील व्हायचे की नाही किंवा कधी व्हायचे, हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला देणे अधिक सयुक्तिक ठरणार असून राज्याच्या प्रवेशप्रक्रियेला तोपर्यंत मान्यता देण्याबाबत केंद्र सरकारला अधिसूचना जारी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तरीही केंद्र सरकारचे वेळकाढू धोरण असल्याने पालक व विद्यार्थ्यांवर ‘नीट’ची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील, असे तावडे यांनी नुकतेच सांगितले होते. पण फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हा विषय नेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे फारसे प्रयत्न केलेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
‘नीट’ सक्तीतून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लाखो विद्यार्थी व पालक चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पावले टाकून तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष वर्ग सुरू करून व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.