मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरा-मोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र ‘आरोग्य विषयक धोरण’ बनविण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. भविष्यात महाराष्ट्रात ‘आरोग्य पर्यटन’ ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन असून हा दिवस राज्य, जिल्हास्तरावर व सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावीपणे राबविण्याच्या तसेच वाढते मधुमेहाचे रुग्ण पाहता आवश्यक तपासणी करून उपाययोजना करण्यात याव्या. तसेच जागतिक कर्करोग दिनापासून महिला कर्करोग रुग्णांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करून त्यांना योग्य उपचार विनामूल्य उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी, वैद्याकीय देयके प्रतीपूर्तीचे प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे प्रलंबित राहतात. त्यामुळे सर्व वैद्याकीय देयके दप्तरी दाखल झाल्यापासून सात दिवसांत मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

अपंगांना बोगस प्रमाणपत्रे देणारे व त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. बैठकीला सहसचिव विजय लहाने, अशोक अत्राम, उपसचिव शिवदास धुळे, दीपक केंद्रे उपस्थित होते.

रिक्तपदांबाबत कार्यवाही

आरोग्य सेवेपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही. यासाठी आरोग्य संस्थामधील ‘ब’ वर्गातील डॉक्टरांच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच आरोग्य खात्यांतर्गत शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या चौकशी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. योग्य असेल त्यांना न्याय द्यावा, प्रकरणे प्रलंबित ठेवू नका, असे स्पष्ट निर्देश आबिटकर यांनी दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister prakash abitkar announces separate health policy for the maharashtra state amy