मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने मंगळवारी तातडीने सुनावणी घेण्यास सुरुवात केली. देशमुख यांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश देऊनही मे महिन्यापासून उच्च न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवली होती. या बाबीवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. तसेच देशमुख यांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याचे आणि त्यावर निर्णय देण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा >>> लोकशाहीत बहुमताला महत्त्व; न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
हेही वाचा >>> बारा आमदारांची नियुक्ती लांबणीवर; १४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती
या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल पीठासमोर मंगळवारी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. तसेच देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी त्यांचा युक्तिवादही पूर्ण केला. देशमुख हे ७२ वर्षांचे असून विविध आजारांनी त्रस्त आहेत. शिवाय देशमुख यांना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. गेल्या ११ महिन्यांपासून ते कोठडीत आहेत. देशमुख यांच्याविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नसल्याने त्यांना यानंतर एक दिवसही कारागृहात ठेवले जाऊ शकत नाही, असा दावाही चौधरी यांनी केला. बडतर्फ पोलीस अधिकार सचिन वाझे यांच्या जबाबाच्या आधारे देशमुख यांना या प्रकरणी गोवण्यात आले आहे. तसेच खंडणी गोळा करण्याचे आदेश देणारी व्यक्ती देशमुख हे नव्हे, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत. हेच परमबीर केंद्रीय तपास यंत्रणांना प्रिय आहेत असा आरोपही चौधरी यांनी केला.