मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील २२ आमदारांनी ‘आपल्याला पक्षादेश (व्हीप) मिळालाच नव्हता’, असा दावा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत गुरुवारी केला. यासह अन्य काही मुद्दय़ांवर कागदपत्रे, पुरावे आणि शपथपत्रे सादर करण्यासाठी पुन्हा १५ नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली असून आता २१ तारखेपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सहकार्य केले, तरच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ३१ डिसेंबरच्या कालमर्यादेत याचिकांवर निर्णय देता येईल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
काही आमदारांचे ई मेल चुकीचे आहेत, उद्धव ठाकरे यांचे पक्षादेश पाठविणारे विजय जोशी कोण, हे माहीत नाही, असे मुद्दे शिंदे गटाकडून मांडण्यात आले. तर आमदारांचे खरे ईमेल कोणते, अशी विचारणा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली.