औरंगाबाद येथे एका अपघातात २४ वर्षांचा राम गंभीर जखमी झाला. तो ‘ब्रेन डेड’ असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तेव्हा रामच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मूत्रपिंड, यकृत आणि हृदय वेगवेगळ्या रुग्णालयात जीवन मरणाच्या सीमारेषेवर असलेल्या रुग्णांच्या आयुष्याची दोरी बळकट करणार होते. औरंगाबाद आणि मुंबईतील दोन रुग्णालयांतील डॉक्टरांनी रामचे मूत्रपिंड व यकृत काढून मुंबईतील रुग्णांकरिता नेले, परंतु मुंबई-औरंगाबाद-चेन्नई असे विमान वेळेत न मिळाल्यामुळे चेन्नईमधील रुग्णालयात हृदयाची वाट पाहणाऱ्या रुग्णाला हृदय मिळू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामच्या नातेवाईकांनी हृदय घट्ट करून अवयवदानाचा निर्णय घेतला खरा परंतु विमानसेवा कंपनीकडून वेळेत विमान न मिळाल्यामुळे एका हृदयाचा घात झाला.

अवयवदानाच्या या प्रक्रियेत शासकीय यंत्रणेतील प्रत्येकाने वेळेचे मोल ओळखून तात्काळ निर्णय घेतला होता.

१३ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील एमआयटी रुग्णालयात रामला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्याची तयारी दाखवली आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, अवयव प्रत्यारोपणासाठी परवानगी देणाऱ्या समितीच्या (झेडटीसीसी) डॉ. सुजाता पटवर्धन, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. गौरी ठाकूर तसेच औरंगाबादचे डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी परवानगीसाठीच्या साऱ्या प्रक्रिया तात्काळ पूर्ण केल्या.

औरंगाबाद येथील एका रुग्णालयातील रुग्णाला एक मूत्रपिंड देण्याचा तर मुंबईतील ग्लोबल आणि जसलोक रुग्णालयात दुसरे मूत्रपिंड आणि यकृत देण्याचा निर्णय झाला. रामचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याने व त्या रक्तगटाचा हृदयप्रत्यारोपणासाठीचा रुग्ण राज्यात नसल्याने चेन्नईच्या रुग्णालयातील एका रुग्णाला हृदय देण्याचा निर्णय घेण्यात आला.

चेन्नईमधील डॉक्टरांचे पथक मुंबईत पोहोचलेही. प्रश्न होता तो मुंबईहून औरंगाबाद व तेथून थेट चेन्नईला जाणारे विमान मिळण्याचा. चेन्नईच्या डॉक्टर व पथकाने विमान कंपन्यांशी बोलणी केली. मात्र चार्टर फ्लाइटसाठी २२ लाख रुपये भाडे सांगण्यात आले.

वाटाघाटीत काही वेळ गेला. अखेर थेट जाणारे विमान उपलब्ध न झाल्यामुळे रात्री एक वाजता औरंगाबाद येथील ‘सिग्मा’ रुग्णालयात रामचे मूत्रपिंड व यकृत काढण्याची शस्त्रक्रिया झाली.

मुंबईहून औरंगाबादला विमान आल्यानंतर दोन तासांत हृदय काढून चेन्नईला नेणे आवश्यक होते. तशी विमानसेवा उपलब्ध झाली नाही आणि हृदय काढल्यापासून सहा तासांत शस्त्रक्रिया होणे आवश्यक असल्यामुळे अखेर चेन्नईचे डॉक्टर परत गेले आणि हृदयदान होऊ शकले नाही.

डॉ. सुधीर कुलकर्णी, झेडटीसीसीचे प्रभारी प्रमुख