मुंबई : जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच मुलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले, मात्र साडेचार वर्षांची होईपर्यंत तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पालकांना धक्काच बसला. त्यामुळे ती साडेचार वर्षांची होईपर्यंत तिला श्वास घेण्यास आणि जेवताना होणार त्रास पाहून पालकांचे मन हेलावून जात होते. परळमधील वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी या साडेचार वर्षांच्या मुलीवर आव्हानात्मक अशी हायब्रीड हार्ट सर्जरी यशस्वीरित्या केली. भारतात क्वचितच केल्या जाणाऱ्या या गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रक्रियेने या चिमुरडीचे प्राण वाचले.
कांदिवली येथे राहणाऱ्या आकाश आणि ममता मौर्य या जोडप्याला २०२१ मध्ये कन्यारत्न झाले. मुलगी सान्वीच्या आगमनाने या कुटुंबाला प्रचंड आनंद झाला. परंतु जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तिचा श्वासोच्छवास जलद गतीने होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे नेले. २ डी इको चाचणीने सान्वीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारांसाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हृदयात आकाराने मोठे, तसेच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अवघड असे एक छिद्र आढळले. तिच्या वयोमानासुार या टप्प्यावर खुली शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी ती साडेतीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर तात्पुरती पीए बँडिंग शस्त्रक्रिया करून हृदयावरील ताण कमी केला. तिच्या हृदयातील छिद्रामुळे तिचे दैनंदिन जगणे अवघड झाले होते. ती फारशी हालचाल न करताही थकायची, तिच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे ती खेळू किंवा धावू शकत नव्हती. तिचा बहुतेक वेळ घरातच जात असे. अन्य मुलांप्रमाणे तिला हसता, खेळता आणि स्वच्छंदपणे जगता येत नसल्याचे मौर्य कुटुंब चिंताग्रस्त होते.
हृदयाला असलेल्या छिद्रामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, वाढ खुंटणे या समस्यांचा तिला सामना करावा लागला होता. सान्वीच्या हृदयातील छिद्र बुजविणे आवश्यक होते. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाला ५ ते ७ दिवस आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवावे लागते. वाडिया रुग्णालयातील बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. क्षितिज सेठ आणि डॉ. जैन यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅबमधील डॉक्टरांच्या पथकाने हायब्रिड तंत्राचा वापर करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये हृदयात एक उपकरण घालून फुफ्फुतील धमनीचा विस्तार करण्यात आला. हायब्रिड तंत्रज्ञान हे अलीकडच्या काळात वापरले जाणारे प्रभावी तंत्रज्ञान असून यामध्ये गुंतागुंत टाळता येते. हृदयशल्यविशारद व हृदयरोग तज्ज्ञ एकमेकांच्या सहकार्याने ही प्रक्रिया करतात. या पद्धतीमुळे शस्त्रक्रियेचा एकूण वेळ फक्त २.५ ते ३ तासांपर्यंत कमी झाला. तसेच बरे होणाचा कालावधी कमी झाला. आता तिची प्रकृती उत्तम असून, तिला घरी पाठवण्यात आले.
हायब्रिड शस्त्रक्रिया सामान्यतः दर ४ ते ५ वर्षांनी एकदाच होते. एकाच ठिकाणी कुशल तज्ज्ञ, आधुनिक पायाभूत सुविधा आणि अचूक इमेजिंग तंत्रज्ञान आदी उपलब्ध होते तेव्हाच अशी शस्त्रक्रिया करणे शक्य होते.- डॉ. बिस्वा पांडा, बाल हृदयरोग तज्ज्ञ, वाडिया रुग्णालय
मुलीला दररोज संघर्ष करताना पाहणे आमच्यासाठी वेदनादायक होते. ती इतर मुलांप्रमाणे खेळू शकत नव्हती, ती लगेचच थकायची आणि तिचा बहुतेक वेळ घरातच जायचा. वाडिया रुग्णालयातील या यशस्वी शस्त्रक्रियेने तिला जगण्याची संधी मिळाली. आता तिला कोणत्याही वेदनेशिवाय हसण्याबरोबरच शाळेत जाणे आणि मित्रांसोबत खेळता येत आहे. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानतो.- आकाश मौर्य, मुलीचे वडील