राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश, लवकरच केंद्र सरकारची अधिसूचना
हृदयविकारावरील उपचारांअभावी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या देशात एकीकडे वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे हृदयविकारावरील अँजिओप्लास्टीमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती कमी होत नसल्यामुळे अवघ्या पाच टक्के हृद्रुग्णांनाच हा उपचार घेणे परवडत आहे. केंद्र सरकारने या गंभीर वास्तवाची दखल घेऊन नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने हृदय शस्त्रक्रियेतील स्टेण्ट हे ‘औषध’ असल्याचा सुस्पष्ट निर्वाळा दिला असून याबाबतची अधिसूचना लवकरच केंद्रातर्फे जारी केली जाणार आहे. यामुळे यापुढे स्टेण्टचा समावेश ‘राष्ट्रीय अत्यावश्यक औषधां’च्या यादीत करता येऊन त्याच्या किमतीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.
देशात हृदयविकारावर उपचार करणाऱ्या ३९६ कॅथलॅब केंद्रांत २०१४ मध्ये दोन लाख ४८ हजार १५२ रुग्णांवर उपचार करून त्यांना तीन लाख १० हजार स्टेण्ट बसविण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांत या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. देशात सातत्याने वाढणाऱ्या हृदयविकारग्रस्तांचे प्रमाण लक्षात घेता अवघ्या पाच टक्के लोकांवरच प्रत्यक्षात स्टेण्ट बसविण्यात येतात. हृदयविकारावरील उपचारांत रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी बसविण्यात येणाऱ्या स्टेण्ट उपचाराचे प्रमाण देशात दर हजार रुग्णांमागे अवघे तीन असे असून अमेरिकेत हेच प्रमाण दरहजारी ३२ एवढे असल्याचे ‘नॅशनल इंटरव्हेन्शनल कौन्सिल’च्या अहवालात म्हटले आहे.
स्टेण्टचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत करावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात २०१४ साली एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) प्रा. वाय. के. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली होती. या समितीत हृदयविकारतज्ज्ञांसह विविध सरकारी विभागांतील उच्चपदस्थ तसेच स्टेण्ट बनविणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. ‘ड्रग अॅण्ड कॉस्मॅटिक अॅक्ट १९४०’ अंतर्गत वैद्यकीय उपकरण म्हणून वापरण्यात येत असलेल्या स्टेण्टची नोंद अधिसूचित औषध अशीच करण्यात येत असल्यामुळे राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांच्या यादीत त्याचा समावेश करण्याची शिफारस या समितीने केंद्र सरकारला एप्रिल २०१६ मध्ये केली.
स्टेण्टच्या किमती
स्टेण्टच्या किमती साठ हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत असतात. यामध्ये मेडिकेटेट स्टेण्टपासून मेटालिक स्टेण्ट तसेच आता नवीन तंत्रज्ञानावर आधारित हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये विलीन होणाऱ्या स्टेण्टचा समावेश आहे. यासाठी प्रचंड संशोधन व खर्च करावा लागत असल्यामुळे स्टेण्टच्या किमती जास्त असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. तथापि जास्तीत जास्त रुग्णांना उपचार मिळणे आवश्यक असून दर्जा राखून औषधाच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे लीलावतीमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले यांनी सांगितले.
सत्तरच्या दशकात हृदयविकारावरील उपचार बलूनप्लास्टीद्वारे केले जात. ऐंशीच्या दशकात स्टेण्टचा वापर सुरू झाला. स्टेण्टचा समावेश औषध म्हणून करण्याच्या निर्णयामुळे जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होणार आहे. परंतु असे करताना स्टेण्टच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. – डॉ. गजानन रत्नपारखी, हृदयविकारतज्ज्ञ