गुगलच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या नील मेहता याने शोधून काढलेल्या ‘हार्टब्लीड’ या ‘बग’मुळे सध्या सायबर क्षेत्रात त्यापासून वाचण्यासाठी सुरक्षा कवच तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या हार्टब्लीडचा सर्वात मोठा धोका अँड्रॉइड फोनला असल्यामुळे सायबर सुरक्षा यंत्रणा राबविणाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. यावर वेळीच उपाय योजण्यात नाही आले तर लाखो अँड्रॉइड युजर्सना फटका बसू शकतो.
अँड्रॉइडची ४.०.१ म्हणजेच ‘आयस्क्रीम सँडविच’ ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि या पुढच्या सर्वच व्हर्जनना या बगचा धोका असल्याचे खुद्द गुगलतर्फेच स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ओपन एसएसएलचे १.०.१ हे व्हर्जन वापरण्यात आलेले आहे. याच व्हर्जनमध्ये ‘हार्टब्लीड’ आढळल्यामुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात ब्लूबॉक्स सिक्युरिटी या कंपनीने सर्वेक्षण करून अँड्रॉइडचे कोणते व्हर्जन धोकादायक आहे आणि कोणते नाही याबाबत माहिती दिली आहे. यानुसार अँड्रॉइडच्या ४.१.१ या किट कॅट व्हर्जनला याचा सर्वाधिक धोका असणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर वेळेत उपाय शोधले नाही तर सर्वाच्या मोबाइलमधील माहिती सायबर हल्लेखोरांना सहजच चोरता येऊ शकेल. तुमचा फोन या बगपासून किती सुरक्षित आहे किंवा नाही याबाबत जाणून घेण्यासाठी ब्लूबॉक्स सिक्युरिटीने ‘हार्टब्लीड स्कॅनर’ नावाचे एक मोफत अॅपही तयार केले आहे. याचा वापर करून आपला फोन सुरक्षित आहे की नाही हे आपल्याला समजू शकते. दरम्यान, हार्टब्लीड या बगमुळे तमाम इंटरनेट विश्व हादरून गेलेले असताना आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक मात्र सुरक्षित असल्याचा दावा ‘अॅपल’ने केला आहे.
‘हार्टब्लीड’मुळे अँड्रॉइड फोनला सर्वाधिक धोका!
गुगलच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या नील मेहता याने शोधून काढलेल्या ‘हार्टब्लीड’ या ‘बग’मुळे सध्या सायबर क्षेत्रात त्यापासून वाचण्यासाठी सुरक्षा कवच तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
First published on: 15-04-2014 at 03:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartbleed bug could attack millions of android