मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. तापलेल्या वातावरणामुळे सोमवारीही मुंबईकरांच्या अंगाची काहिली होत आहे. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. रेल्वेतील प्रवासही असह्य करणारा होता. दरम्यान, असे वातावरण मंगळवारी आणि बुधवारीही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.शहर आणि उपनगरांत सोमवारी दुपारी उन्हाचा दाह सोसावा लागत होता. कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी नागरिकांची लाही होत आहे. सोमवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. सकाळी १० नंतरच उन्हाची तीव्रता वाढली आणि झळा जाणवू लागल्या.
रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३३.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी सांताक्रूझ येथील तापमानात २.४ अंशानी वाढ झाली. येथील तापमान सोमवारी सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. ठाणे येथे सोमवारी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी ठाणे येथील कमाल तापमानात काहीशी वाढ झाली.हीच स्थिती मंगळवार आणि बुधवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यानंतर शुक्रवारपासून तापमानात काहीशी घट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईकर घामाच्या धारांनी हैराण होत आहेत. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
अकोला सर्वाधिक उष्ण
राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली आहे. येथे कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस इतके होते. याखालोखाल जळगाव ४२.५ अंश सेल्सिअस, लोहगाव ४२.२ अंश सेल्सिअस, मालेगाव ४१.६ अंश सेल्सिअस, परभणी ४२.१ अंश सेल्सिअस, तर अमरावती येथे ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा इशारा
अवकाळी पावसाचे वातावरण ओसरताच राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातही उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पुढील काही दिवस कोकणात असह्य उकाडा सहन करावा लागले. याचबरोबर तेथील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर, विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अकोला, नागपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात मंगळवारी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे
– संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे.
– शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
– पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या.
पावसाचा अंदाज कुठे
हवामान विभागाने मंगळवारी कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोलापूर आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे.