अमरावती / मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी उष्णतेची लाट परतली. अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणे, महाबळेश्वर आणि माथेरानमध्येही उकाडा वाढल्यामुळे शनिवारी-रविवारी तेथे गेलेल्यांची निराशा झाली. दुसरीकडे अमरावती विभागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून महिनाभरात टँकरग्रस्त गावांची संख्या दुप्पट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मात्र त्यानंतर आता उकाडय़ाने जीवाची काहिली सुरू झाली असून पाणीटंचाईच्या झळा अधिकाधिक जाणवू लागल्या आहेत.  गर्तेत सापडलेल्या पश्चिम विदर्भातील गावांची संख्याही तितक्याच झपाटय़ाने वाढत आहे. साधारणत: महिनाभरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून त्यामुळे त्याच प्रमाणात टँकरची संख्याही विस्तारली आहे. सद्यस्थितीत विभागातील टँकरचा आकडा ५५ पर्यंत पोहचला आहे.  अमरावती विभागात २८ मार्च रोजी २६ गावांना २६ टँकरने पाणीपुरवठा होत होता. परंतु, ऊन तापू लागल्यानंतर रविवापर्यंत टँकरग्रस्त गावांची संख्या ५१ झाली आहे. सर्वाधिक ४७ टँकर बुलढाणा जिल्ह्यात असून अमरावती जिल्ह्यातील ४ गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका गावात टँकर सुरू झाला आहे. अद्याप संपूर्ण मे महिना बाकी असल्याने दुष्काळाच्या कचाटय़ात सापडणाऱ्या गावांची आणि पर्यायाने टँकरची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.  ग्रामीण भागांत नदी, नाले, ओहोळ कोरडेठाक पडले असून लहान बंधारे, धरणेही कोरडी झाली आहेत. अशा स्थितीत गावांना केवळ विहिरींचा आधार होता. आता तोही संपुष्टात येऊ लागला आहे. नागरिकांसह जनावरांच्याही पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. 

हेही वाचा >>>मुंबईतील १७ भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदेस ७ मे पर्यंत मुदतवाढ

माथेरान मुंबईपेक्षा गरम

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरामचे कमाल तापमान रविवारी मुंबईपेक्षाही जास्त नोंदविले गेले. मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या ‘हिल स्टेशन’वर तब्बल ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र संध्याकाळनंतर तापमानात घट होण्यास सुरवात झाली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या उकाडय़ापासून बचावासाठी तेथे गेलेल्या पर्यटकांचा प्रचंड विरस झाला. 

सोलापुरात सर्वाधिक तापमान

राज्यातील सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद रविवारी ४३.७ अंश सेल्सिअस सोलापूर येथे झाली. जळगाव (४२.२), मोहोळ (४२.५), नांदेड (४२.४), सांगली (४१), सातारा (४०.५) येथेही तापमान अधिक होते. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे कमाल व किमान तापमानात वाढ झाली.  काही भागात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat wave in most parts of the state including konkan coast as per weather department forecast amy
Show comments