मुंबई : विदर्भ, छत्तीसगड, ओडिशावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातवर तयार झालेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती विदर्भ, छत्तीसगड आणि ओदिशाच्या दिशेने पुढे सरकली आहे. मोठ्या भूभागावर प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे उष्णतेची लाटही मोठ्या भूभागावर निर्माण झाली आहे, शिवाय तीव्रताही जास्त आहे. विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याला नारंगी इशारा, तर अकोला, अमरावती, नागपूरला पिवळा इशारा देण्यात आला आहे.

वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती पूर्वेच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता असल्यामुळे बुधवार आणि गुरुवारी विदर्भातील काही ठिकाणी आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Story img Loader