मुंबई : मुंबईत उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा तडाखा बसणार आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबईकरांना गेले काही दिवस उष्ण व दमट हवामानाला तोंड द्यावे लागते आहे. उन्हाचा ताप तसेच उष्मा अधिक जाणवत असल्यामुळे अंगाची लाही होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३५.३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र पुढील दोन दिवसांत मुंबईतील तापमान वाढणार असून सोमवारी आणि रविवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या वाऱ्यांची दिशा बदलली आहे. पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या कालावधीत तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस राहील. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी रत्नागिरी आणि सोलापूर येथे झाली आहे. दोन्ही केंद्रावर ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.दर दोन दिवसांनी कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उकाडा वाढला आहे. फेब्रुवारीत कमाल तापमानाने सरासरी ओलांडली होती. फेब्रुवारी महिन्यातही उष्णतेच्या लाटांचा इशारा मुंबईला देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
काय काळजी घ्याल?
- थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे
- पुरेसे पाणी प्यावे
- हलक्या रंगाचे, सुती, सैल कपडे परिधान करावेत
- भर दुपारी बाहेर फिरताना छत्रीचा वापर करावा, टोपी घालावी
- चक्कर येणे , डोकेदुखी, मळमळणे, अतिघाम ही लक्षणे उष्माघाताची असू शकतात. त्यानुसार वैद्यकीय मदत घ्यावी
- पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही, दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे
काय करु नये
- उन्हात अती कष्टाची कामे करु नये.
- दुपारी बारा ते तीन दरम्यान आवश्यक नसल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
- बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
मार्चमध्ये नोंदलेले तापमान
५ मार्च – ३७.४ अंश सेल्सिअस
४ मार्च – ३६.८ अंश सेल्सिअस
३ मार्च – ३५.३ अंश सेल्सिअस
२ मार्च – ३५.१ अंश सेल्सिअस
१ मार्च – ३४.८ अंश सेल्सिअस