मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांतील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवस शहर आणि उपनगरांत अधिक उष्मा जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठाणे , पालघरमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

मुंबईतील तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी झाले असले तरी उकाडा वाढताच आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मात्र हवेत ८४ ते ८६ टक्के आद्रता होती. दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी मुंबई उष्ण व दमट वातावरण असेल तसेच या कालावधीत तापमान ३४ ते ३५ अंशादरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांना मंगळवारी मुंबईत असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल.

उशिरा येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे ही वातावरणाची स्थिती दोन दिवसच राहील त्यानंतर पुन्हा तापमानात घट होईल तसेच रात्रीचा काहीसा गारवा देखील अनुभवता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, वादळी पाऊस दूर झाल्याने राज्यात पुन्हा उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून उकाड्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम वदर्भापासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागरात बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली असल्याने पूर्व भारतातील राज्ये आणि पूर्व किनाऱ्यावर वाऱ्यांचा संगम होत आहे.

तापमान सरासरी इतकेच

सध्या दिवसाचे कमाल तापमान कोकणात ३० ते ३२ अंश सेल्सिअस , तर राज्याच्या उर्वरीत भागात ३६ अंशाच्या दरम्यान आणि किमान तापामान १८ ते २० अंशाच्या दरम्यान आहे. ही दोन्ही तापमाने सरासरी इतक्याच श्रेणीत आहेत.

अकोला येथे सर्वाधिक तापामानाची नोंद

अकोला येथे सोमवारी सर्वाधिक तापामानाची नोंद झाली. येथे ४०.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्या खालोखाल मालेगाव येथे ३९.२ अंश सेल्सिअस, लोहगाव ३९.५ अंश सेल्सिअस आणि जळगाव येथे ३९.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

अवकाळीचे वातावरण निवळणार

सोमवारपासून राज्यातील अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी पीक काढणी दरम्यानचा धोका टळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मागील आठवड्यात ३-४ दिवस तापमानवाढीमुळे राज्याच्या काही भागात उष्णता अधिक जाणवली. पण त्यानंतर लगेचच कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला.