मुंबई : राज्यामध्ये मार्चपासून उकाड्याला सुरुवात झाली असून, तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिलमधील ११ दिवसांत उष्माघाताचे ३४ रुग्ण सापडले आहेत. मार्चच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. मार्चमध्ये उष्माघाताच्या ३० रुग्णांची नोंद झाली होती. एप्रिलमध्ये बुलढाणा, गडचिरोली, नागपूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. मार्चपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यातील ११ दिवसांमध्ये राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे ३४ रुग्ण सापडले आहेत.

बुलढाण्यामध्ये सहा, गडचिरोली, नागपूर आणि परभणीमध्ये प्रत्येकी चार, जालन्यामध्ये तीन, लातूर, वर्धा, नाशिक, पालघर प्रत्येकी दोन, तर नांदेड, उस्मानाबाद, रायगड, सांगली, ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मार्चच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये बुलढाणा, जालना जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातून बाहेर पडू नये. आपली कामे सकाळी ७ ते १२, तसेच दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत पूर्ण करावी. तसेच घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गॉगल, पाण्याची बाटली सोबत घ्यावी, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिला आहे.

काय काळजी घ्याल

  • पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात – गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
  • उन्हात जाताना टोपी किंवा हॅटमध्ये ओलसर कपडा ठेवा.
  • पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
  • पंखा, कुलर आणि ओलसर पडदे यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करु नका

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
  • कष्टाची कामे उन्हात करू नका.
  • रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
  • गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका.
  • उन्हात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.
  • शिळे अन्न आणि खूप प्रथिन युक्त अन्नपदार्थ खाऊ नका.