मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये वाढत असलेल्या उकाड्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले आहे. नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर, अतिसार, उलट्या असा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उष्णतेमुळे हा त्रास वाढत असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून किंवा कार्यालयातून बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मुंबईतील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी किंवा उन्हामध्ये बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील १० दिवसांमध्ये अतिसार व उलटीचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा… मुंबई : प्रसाधनगृहात महिलेवर अतिप्रसंग; तरुणाला अटक

अनेक नागरिक घरातून बाहेर पडताना सोबत पिण्याचे पाणी घेत नाहीत. तहान लागल्यानंतर ते कोठेही पाणी पितात किंवा लिंबू पाणी, फळांचा ज्यूस घेतात. मात्र सरबत, ज्यूससाठी वापरण्यात येणारे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत असल्याने नागरिकांना अतिसार व उलटीचा त्रास होत आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर ऑफ मेडिसिन शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.

तसेच सकाळी धावण्यासाठी जाणारे तरुण स्वत:कडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना निर्जलीकरणाचा त्रास होत असून अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती डॉ. जगियासी यांनी दिली.

हेही वाचा… निवडणुकीच्या धामधुमीत दूरदर्शनची वृत्तवाहिनी भगवी

काही दिवसांपासून उलटी, अतिसार, थकवा आणि चक्कर असा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्रास होत असलेल्या रुग्णांनी दुपारी घरातून बाहेर न पडण्याचा, तसेच बाहेरील पाणी पिऊ नये आणि खाद्यापदार्थही खाऊ नये, असा सल्ला डॉ. सुचित्रा वराळे यांनी दिला.

लहान मुले उन्हामध्ये खेळत असल्याने त्यांना उष्माघाताचा सौम्य त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत असल्याचे डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heatwave heat to people of mumbai due to citizens suffering vomiting dizziness and diarrhea mumbai print news asj