IMD issues heatwave warning in Mumbai : राज्यातील अनेक भागांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभाग (IMD) ने ९ आणि १० मार्च रोजी मुंबई, ठाणे आणि रायगडमधील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दोन आठवड्यांत शहरात दुसर्‍यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहरात सध्या दिवसाच्या वेळी तापमान चांगलेच वाढताना दिसत आहे. त्यामुळे हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे. हा इशारा शुक्रवार पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या डेटानुसार शहरात दिवसा तापमान वाढत आहे, मात्र रात्री तुलनेने तापमान कमी झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी उपनगर भागात किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्य तापमानापेक्षा १ अंश सेल्सिअसने कमी होते.

येत्या आठवड्यात तापमान कसे असेल?

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहराला यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती जवळपास शुक्रवार पर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. तसेच येत्या शनिवार-रविवारसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ९ आणि १० मार्च या काळात तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी या उष्णतेच्या लाटेबद्दल माहिती देताना सांगितले की याचा संबंध या भागावर तयार होत असलेल्या अँटीसायक्लोन प्रणालीशी असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई येथील शास्त्रज्ञ निथा ससिधरन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की महाराष्ट्रावर तयार होत असलेल्या अँटीसायक्लोनमुळे देशाच्या अंतर्गत भागातून जोरदार वारे येत आहेत. हे वारे पश्चिमेकडून समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याला रोखत आहेत, त्यामुळे तापमान सामान्यापेक्षा ४-५ अंशांनी जास्त आहे.

सलग दोन दिवस तापमान सामान्यपेक्षा ४-५ अंशांनी जास्त राहिल्यास उष्णतेच्या लाटेचा इशारा जाहीर केला जातो. मुंबईत यापूर्वी देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यात आएमडीने फेब्रुवारी २५ आणि २६ या दोन दिवशी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. या दिवसांत शहरातील तापमान ३८ अंश सेल्सियसच्या वर पोहचले होते. या काळात मुंबईतील तापमानाने आठ वर्षातील उच्चांक म्हणजेच ३८.७ अंश सेल्सिअस गाठला होता.

Story img Loader