रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने ठाणे परिसराला चांगलेच झोडपून काढले. मुंब्रा येथील एका चार मजली इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्याने पाच जण अडकून पडले. मात्र अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती निवारण विभाग कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. आधीच मेगा ब्लॉकमुळे अनियमित असलेली मध्य रेल्वेची उपनगरी सेवा ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोलमडली. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.
ठाण्यात कोपरी, शिवाईनगर, वृंदावन, वंदना, महाराष्ट्र विद्यालय आदी ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, ठाणे जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. वाडा, शहापूर भागात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. अंबरनाथ तालुक्यात आठ तासात ७० मि.मि. तर कल्याण तालुक्यात ११७ मि.मि. पावसाची नोंद झाली.
अंबरनाथमधील शिवाजी चौकातील खुले नाटय़गृह पाडून सुरू असलेल्या वाहनतळाच्या कामाभोवती उभारण्यात आलेली पत्र्याची संरक्षक भिंत पहिल्याच पावसाच्या तडाख्याने आडवी झाली. या भिंतीलगतच पोलीस चौकी आहे. सुदैवाने भिंत कोसळण्याआधीच पोलिसांनी चौकीतील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे अनर्थ टळला.