मुंबई : दसऱ्यानिमित्त आझाद मैदान आणि दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणारे मेळावे आणि देवी विसर्जन या पार्श्वभूमीवर मुंबईतील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी मुंबईत सुमारे १५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी ६ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २७ उपायुक्त, ५४ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २३०० पोलीस अधिकारी, १२ हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणांवर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३३ प्लाटून, शीघ्र कृती दल व गृहरक्षक दल तैनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> विरार – बोळींजमधील म्हाडा रहिवाशांना अखेर दिलासा, ९४०९ सदनिकाधारकांच्या मासिक सेवा शुल्कात कपात

मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. १०० अधिकारी, ६०० अंमलदार व राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ प्लाटून शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय आझाद मैदान येथे दक्षिण प्रादेशिक परिमंडळाचे अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल यांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा ; तापमानात घट

दोन्ही गट यावेळी शक्ती प्रदर्शन करणार असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गट आणि आणि गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्याच दिवशी देवींची विसर्जन मिरवणूक देखील असणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणांवरही बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.