मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सातही तलावांतील पाणीसाठा ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. काल एका दिवसात १८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमध्ये सध्या ९३.२२ टक्के पाणीसाठा आहे. सातही धरणात मिळून सध्या १३ लाख ४९ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. बुधवारपासून पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा खूपच जास्त आहे. तलावांच्या पाणीसाठयात आता केवळ ७ टक्के तूट आहे.
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या सातही तलावांची पाणी साठवण्याची क्षमता साडेचौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. यावेळी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर भवि्यात पाणी कपातीची आवश्यकता नसते. सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस पडल्यानंतर तलावांतील तूट भरून निघेल, असा विश्वास जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तीन वर्षांचा १० ऑगस्टपर्यंतचा जलसाठा
वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी
२०२२ – १३,४९,२२८ ,….. ९३.२२ टक्के
२०२१ – ११,६८,२४५ …. ८०.७२ टक्के
२०२० – ७,५१,८०६ …. ५१.९४ टक्के